Raigad: आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी
By राजेश भोस्तेकर | Updated: October 19, 2022 18:57 IST2022-10-19T18:39:25+5:302022-10-19T18:57:38+5:30
Raigad News: अलिबाग तालुक्यातील थळ, वायशेत येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन स्टीम प्लांटमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.

Raigad: आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी
- राजेश भोस्तेकर
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील थळ, वायशेत येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आरसीएफ कंपनीत जीटीजी या नव्या प्लांटचे काम सुरू होते. ए टी जी प्लांट मध्ये एसी बसविण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. या अपघातात एक मॅनेजमेंट ट्रेनीसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खत निर्मिती करणारा केंद्र शासनाचा आर सी एफ प्रकल्प अलिबाग तालुक्यातील थळ येथे आहे. या कंपनीत नवीन ए सी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम मेसर्स एरिझो ग्लोबल या कंपनीस दिले होते. या कंपनीचे कर्मचारी हे जीटीजी प्लांट मध्ये काम करीत होते. या कर्मचाऱ्यासोबत कंपनीचा कर्मचारीही होता. एसी बदलल्यानंतर ती सुरू करताना सायंकाळी पाच वाजता अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक कंपनी कर्मचारी आणि दोन कंत्राटी कर्मचारी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य तीन जण हे गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांनाही आर सी एफ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथे हलविण्यात आले आहे.
कंपनीत झालेला स्फोट हा कर्मचारी याच्या हलगर्जीपणा मुळे झाल्याचे कळत आहे. स्फोटाचा आवाज हा इतका मोठा होता की आजूबाजूच्या गावातही आवाज ऐकायला आला. स्फोटानंतर आर सी एफ अग्निशमन यंत्रणा, पोलीस दल, सीआयआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
आरसीएफ स्फोटातील जखमी व मयत व्यक्तींची नावे
साहिद मोहम्मद सिद्दीकी (23)
जितेंद्र शेळके (34)
अतिनदर मनोज
मयत व्यक्ती
अंकित शर्मा (२७)
फैजून जुनेद शेख (32)
दिलशाद आस्लाम इदनिकी (29)