Raigad: रायगडमधील ताजपूर गावच्या पाण्याच्या टाकीवर कोसळली दरड, गावचा पाणी पुरवठा बंद
By राजेश भोस्तेकर | Updated: July 28, 2023 15:39 IST2023-07-28T15:39:26+5:302023-07-28T15:39:59+5:30
Raigad: लिबाग तालुक्यातील वाघजाई येथे गुरुवारी छोटी दरड पडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास रामराज विभागातील ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड पडली आहे.

Raigad: रायगडमधील ताजपूर गावच्या पाण्याच्या टाकीवर कोसळली दरड, गावचा पाणी पुरवठा बंद
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - रायगड जिल्ह्यात आठवडाभर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने अनेक डोंगर भागात दरड पडण्याच्या घटना घडत आहेत. अलिबाग तालुक्यातील वाघजाई येथे गुरुवारी छोटी दरड पडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास रामराज विभागातील ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड पडली आहे. त्यामुळे परिसरात मातीचा ढिगारा साचल्याने गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने यात कोणासही दुखापत झालेली नाही आहे. अलिबाग महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून नागरिकांना पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी प्रश्न निर्माण झाल्याने टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार विक्रम पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अलिबाग तालुक्यात गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. डोंगर भागात राहणाऱ्या नागरिकांना दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. इर्शाळवाडी दरड दुर्घटना झाल्यापासून जिल्ह्यात कुठे ना कुठे दरड पडण्याच्या घटना घडत आहेत. अलिबागमध्ये दोन दिवसात लहान मोठ्या दरड पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे डोंगर भागात राहणाऱ्या नागरिक हे दरडीच्या भीतीच्या सावटाखाली आहेत.
अलिबाग तालुक्यातील रामराज विभागात ताजपुरी गाव हे डोंगर भागात वसलेले आहे. याठिकाणी दोनशे घराची वस्ती आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी आणि विहित ही वस्तीच्या खालच्या भागात डोंगर उतारावर बांधण्यात आलेली आहे. अलिबागमध्ये सतत पाऊस पडत असल्याने डोंगरातून उतारावरून पाण्याचा निचरा होत आहे. शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास मुसळधार पडत असलेल्या पावसाने टाकी आणि विहीर परिसरातील वरील मातीचा ढिगारा कोसळला. डोंगराची पडलेली मातीची दरड ही पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात कोसळली आहे. त्यामुळे या परिसरात ढोपरभर मातीचा ढिगारा साचला आहे. दरडी मुळे टाकीचे नुकसान झाले असून त्यातून पाणी वाहत होते.
दरडी कोसळण्याची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरड कोसळल्याने पाणी पुरवठा टाकी ही मातीत गाडली गेली आहे. त्यामुळे पाण्याचे गावात जाणारे कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे. गावाच्या पाण्यासाठी टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी संबंधितांना दिल्या आहेत. दरड ही खालच्या बाजूला कोसळली असल्याने वरच्या गावाला धोका नसला तरी नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत.