पुलाच्या कामात घोळ
By Admin | Updated: April 16, 2017 04:36 IST2017-04-16T04:36:41+5:302017-04-16T04:36:41+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी

पुलाच्या कामात घोळ
- संदीप जाधव, महाड
मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी चक्क शेतातील मातीचा वापर केला जात आहे. या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
पुलाच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आलेला मातीचा भराव सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याचा धोका असून त्या ठिकाणी सावित्री पूल दुर्घटनेसारखीच दुसरी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.
महामार्गावर महाडजवळील सावित्री नदीवरील पूल गेल्यावर्षी २ आॅगस्ट रोजी रात्री कोसळून दोन एसटी बससह एक तवेरा जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेलीहोती. यादुर्घटनेत ४० प्रवाशांचे बळी गेले होते. महाराष्ट्रातही या घटनेमुळे हाहाकार माजला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाकडून नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा महामार्ग विभागाचा प्रयत्न असला, तरी पुलाच्या दोन्ही बाजूंकडून उभारण्यात आलेल्या आरसीसी संरक्षक भिंतीच्या आत ३० फुटांहून अधिक उंचीचा भराव टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
भरावासाठी कठीण मुरु म व रबल सोलिंग ऐवजी शेतातील मातीचा हजारो ब्रासचा भराव टाकण्यात येत असल्याची बाब महामार्ग विभागाच्या अभियंत्याच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन निदर्शनास आणून दिली.
पुलाच्या दोन्ही बाजूंकडे टाकण्यात येत असलेला हा भराव अतिवृष्टीत नदीच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचा धोका असल्याचेही माणिक जगताप यांनी या अभियंत्याच्या लक्षात आणून दिले. प्रत्यक्षात या पुलाच्या कामाच्या अंदाजपत्रकात कठीण मुरु म व
रबल सोलिंगच्या भरावासाठी हा
भराव करण्याचे स्पष्ट असतानाही, अत्यंत निकृष्ट दर्जाची माती या भरावासाठी वापरली जात असल्याने तसेच या मातीचेही बेकायदा
उत्खनन व विनारॉयल्टी वापरली जात असल्याचा आरोपही माणिक जगताप यांनी यावेळी केला.
‘ध्रुव’ संस्थेचे नियंत्रणच नाही
सावित्री नदीवर पुलाच्या बांधकामावर देखरेख व गुणवत्तेबाबत नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारने ध्रुव कन्सल्टन्सी या खासगी एजन्सीला दिलेले आहे. यासाठी ध्रुव कन्सल्टन्सीने देखरेखीसाठी सा. बां. विभागाच्या एका निवृत्त उपअभियंत्याची नेमणूक केली आहे. मात्र, पोलादपूर सा. बां. विभागात उपअभियंता म्हणून सेवाकाळात असताना या उपअभियंत्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या पुलाच्या कामाचा दर्जा व गुणवत्तेबाबत ध्रुव या एजन्सीचे कुठलेही नियंत्रणच नसल्याचे स्पष्ट होत आहे. या पुलाचे काम टी अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीकडून केले जात आहे.