The protection of workers in the industrial sector by companies is on the wind | कंपन्यांकडून औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
कंपन्यांकडून औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

- सिकंदर अनवारे 

दासगाव : रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फारशा सुविधा पुरवण्यात येत नसल्याने त्यांचा जीव नेहमीच टांगणीला असतो. जिल्ह्यात रासायनिक पदार्थांचे उत्पादन करणाºया अनेक कंपन्या आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांमध्ये रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, असे करताना कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे शुक्रवारी माणगाव येथील कंपनीतील स्फोटामुळे समोर आले आहे.

माणगाव तालुक्यातील विळेभागाड येथील क्रिप्टझो इंजिनीअरिंग कंपनीमध्ये शुक्रवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. स्फोटाने औद्योगिक क्षेत्र हादरून गेले. जवळपास १८ कामगार गंभीररीत्या भाजले गेले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील स्फोटाची ही काही पहिलीच घटना नसून रायगड जिल्ह्यातील नागोठणे, महाड, माणगाव, खोपोली औद्योगिक क्षेत्रातही यापूर्वी स्फोट होऊन कामगार जखमी आणि दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. महाड एमआयडीसीमध्येही यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. येथील प्रीव्ही आॅर्गनिक कंपनीत काही दिवसांपूर्वी भीषण आग लागण्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कामगार बचावले होते.

माणगाव आणि महाड यामध्ये ३० कि.मी.चे अंतर आहे, तर पुढे विळेभागाड औद्योगिक क्षेत्र आहे. महाड, माणगाव औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कंपन्या अनेक आहेत. मात्र, कंपनीत असलेल्या यंत्रणा कोणत्याही क्षणी अपघाताला निमंत्रण देत असतात. यामुळे गेल्या अनेक वर्षांत कित्येक कामगारांचा अपघातानंतर उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. ही बाब टाळता यावी म्हणून महाडमध्ये ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतरही या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. शिवाय मनुष्यबळाअभावी अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागते. हीच अवस्था अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयाची बनली आहे.

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन अशा यंत्रणा आहेत. मात्र, हे चालवण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध नाही. यामुळे या मशीन धूळखात पडल्या आहेत. दोन्ही ठिकाणी रुग्णालयाच्या इमारती भल्या मोठ्या बांधल्या गेल्या. मात्र, उपचारासाठी लागणारी आधुनिक यंत्रणा उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव रुग्णांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी उपचाराकरिता जावे लागते. महाडपासून मुंबई हे किमान चार तासांचे अंतर आहे.

सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था पाहिली तर खड्ड्यांनी व्यापलेल्या महामार्गावरून रुग्ण मुंबईमध्ये पोहोचतो की नाही, अशी शंका येते. यासाठी किमान सहा ते सात तास लागत आहेत.
महामार्गावरील वडखळ आणि माणगाव यासारख्या ठिकाणी कायम वाहतूककोंडी असल्याने रुग्णवाहिका पुढे सरकणे शक्य होत नाही. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अपघातानंतरही स्थानिक पातळीवर योग्य उपचार देणे शक्य होत नाही.
रासायनिक कारखान्यातील घटनांत कामगाराला झालेली इजा आणि भाजण्याचे प्रमाण याबाबत तज्ज्ञ डॉक्टर किंवा तशी यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे असते. ती यंत्रणा महाड किंवा औद्योगिक क्षेत्र असलेल्या कोणत्याच ठिकाणी उपलब्ध नाही.

सुरक्षा
साधनांचा अभाव
एमआयडीसीमध्ये कामगार सुरक्षेअंतर्गत काही नियमावली बांधून देण्यात आली आहे. त्यानुसार कंपन्यांनी कामगारांना सुरक्षेची साधने पुरवणे बंधनकारक असते. हेल्मेट, हॅण्डग्लोज, गॉगल पुरवणे आवश्यक आहे. ही साधने अनेक कारखानदार किंवा ठेकेदार कामगारांना पुरवत नाहीत. यामुळे कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.

Web Title: The protection of workers in the industrial sector by companies is on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.