सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; चिंचपाड्यात पोलिसांनी केला लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 01:28 IST2021-03-26T01:28:00+5:302021-03-26T01:28:16+5:30
अनेक जण जखमी ; सिडकोने ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप

सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; चिंचपाड्यात पोलिसांनी केला लाठीचार्ज
पनवेल : सिडकोच्या सिडकोच्या अतिक्रमण पथकामार्फत चिंचपाडा गावातील घरांवर गुरुवारी कारवाई करण्यात येणार असल्याने चिंचपाडा प्रकल्पग्रस्तांनी या कारवाईला विरोध करीत आधी मोबदला द्या नंतर कारवाई करा अशी भूमिका घेत सिडकोच्या कारवाईला विरोध केला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने अनेक महिला जखमी झाल्या असून त्यात लहान मुलीचा समावेश आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ग्रामस्थांना वडघर, करंजाडे या ठिकाणी हलविण्यात आले. विमानतळ बाधितांसाठी सिडकोच्या वतीने वडघर पुष्पकनगर वसवण्यात आले.
या ठिकाणी अजून कोणत्याच प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याने बाधित येथे राहायला गेले नाहीत. आपली गावातील घरे तोडून ग्रामस्थांना त्या घरांची किंमत सिडको देणार आहे. त्या किमतीतून वडघर पुष्पकनगरमध्ये घरे बांधायची आहेत. चिंचपाडा या गावातील अनेक कुटुंब करंजाडेमध्ये राहायला गेले आहेत. सिडकोने सोयी-सुविधांचे केवळ आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात सिडकोने ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला जात आहे. सिडकोकडे प्रकल्पग्रस्तांनी ज्या मागण्या समोर ठेवल्या, त्या मागण्यांकडे सिडको पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.चिंचपाडा गावातील काही घरे तोडण्याचे शिल्लक आहेत. गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी अतिक्रमण पथकाला घोषणा देत विरोध केला, मात्र पोलीस प्रशासनाने या पन्नास ते साठ जमलेल्या मोर्चेकरांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठी चार्जमध्ये अनेक महिला व एक लहान मुलगी जखमी झाली आहे.