रोहा येथे दबावतंत्राचे राजकारण
By Admin | Updated: November 10, 2016 03:33 IST2016-11-10T03:33:19+5:302016-11-10T03:33:19+5:30
रोहा नगरपरिषद निवडणुकीत सामान्य मतदार व कार्यकर्त्यांवर दबावतंत्राच्या अस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अगोदरच कोणता झेंडा घेऊ हाती

रोहा येथे दबावतंत्राचे राजकारण
मिलिंद अष्टिवकर, रोहा
रोहा नगरपरिषद निवडणुकीत सामान्य मतदार व कार्यकर्त्यांवर दबावतंत्राच्या अस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अगोदरच कोणता झेंडा घेऊ हाती या विवंचनेत असलेल्या मतदार व कार्यकर्त्यांवर बडे नेते व त्यांच्या सहकाऱ्यांकडून धमकावण्याचे प्रकार केले जात आहेत. रोह्यातील प्रमुख पक्षांचे मतदार, कार्यकर्ते व सामान्य नागरिक या हीन प्रकारामुळे पुरते हैराण झाले आहेत. रोहा नगर पालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांपासून असे प्रकार येथे सुरू झालेले असून लोक या दबावतंत्राच्या राजकारणाला कंटाळले असल्याचे दिसून येत आहे.
मागील ५ वर्षात ज्या कार्यकर्त्यांकडे ढुंकूनही नेते गणांनी पाहिले नव्हते अशा सर्व कार्यकर्त्यांची आठवण अनेकांना होऊ लागली आहे. काही कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. अशांना दमदाटी होत असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी मतदारांवर दबाव आणला जात आहे. रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीत काम करणारे कर्मचारी व अधिकारी तसेच व्यावसायिक, सरकारी कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांच्यावर प्रमुख पक्षाला मतदान करावे म्हणून दबाव आणला जात आहे. व्हॉटसअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर कुणा नागरिकांनी कुणा विरोधी उमेदवाराची एखादी चांगली माहिती टाकली की त्यास त्वरित बोलावून त्यास समज दिली जात आहे. सत्ता नसतानाही सत्तेत असल्यासारखा आव आणून धमकावणे असे प्रकार बडे नेते करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.