पोलीस पाल्याचे भरतीपूर्व प्रशिक्षण
By Admin | Updated: January 7, 2016 00:52 IST2016-01-07T00:52:11+5:302016-01-07T00:52:11+5:30
रायगड पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना पोलीस सेवेत दाखल करुन घेण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांच्या ७५ मुले आणि ३० मुली अशा

पोलीस पाल्याचे भरतीपूर्व प्रशिक्षण
अलिबाग : रायगड पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना पोलीस सेवेत दाखल करुन घेण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांच्या ७५ मुले आणि ३० मुली अशा एकूण १०५ पोलीस पाल्यांकरिता मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण उपक्रमास प्रारंभ करुन, पोलीस कुटुंबीयांना दिलेला शब्द रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी वास्तवात उतरवल्याने पोलीस कुटुंबांत आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी जिल्ह्यातील विविध समाज घटकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेतली होती.
पोलीस कुटुंबीयांच्या या बैठकीतून, पोलीस पाल्यांना पोलीस खात्याच्या नोकरीत दाखल होण्याकरिता, पोलीस भरती प्रशिक्षण येथे उपलब्ध नसल्याने ते पोलीस भरतीत अपात्र ठरत असल्याचे हक यांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलीस भरती प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु झालेल्या या मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात ७५ मुले आणि ३० मुली असे एकूण १०५ पोलीस पाल्य सहभागी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांच्या प्रत्यक्ष निगराणीत हे प्रशिक्षण पहाटे ५.४५ ते सकाळी ११.३० आणि दु. ३ ते सायं. ६.३० या वेळेत सुरु आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र दंडाळे, जितेंद्र जगदाळे, एस.आर.घाडीगांवकर परिश्रम घेत आहेत. (विशेष प्रतिनिधी)