मुलांशी सकारात्मक सुसंवाद साधा
By Admin | Updated: April 17, 2017 04:34 IST2017-04-17T04:34:54+5:302017-04-17T04:34:54+5:30
आजचे युग संगणकाचे युग आहे. आजच्या मुलांमध्ये स्मरणशक्ती चांगली आहे. पुढे जाण्याची वेगळी ताकद त्यांच्यामध्ये आहे

मुलांशी सकारात्मक सुसंवाद साधा
अलिबाग : आजचे युग संगणकाचे युग आहे. आजच्या मुलांमध्ये स्मरणशक्ती चांगली आहे. पुढे जाण्याची वेगळी ताकद त्यांच्यामध्ये आहे. मात्र, अपयश पचविण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे मुलांना संगणकाचे ज्ञान देत असताना त्यांचे कौतुक करा. त्यांच्या कलागुणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा. मुलांशी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सुसंवाद साधा जेणेकरून मानसिक व शारीरिकदृष्ट्या मुलांची वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ तथा ‘चला मुलांना घडवू या’ या चळवळीचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी केले.
अलिबाग नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, स्वच्छता व आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जागतिक आरोग्य दिनानिमित्त नगरपालिकेच्या शाळेमध्ये शाळेतील मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रशेखर दाभाडकर बोलत होते.
यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, पाणीपुरवठा सभापती राकेश चौलकर, बांधकाम सभापती विजय झुंजारराव, वृषाली ठोसर, चित्रलेखा पाटील, अॅड. गौतम पाटील, सुरक्षा शहा, महेश शिंदे, प्रिया घरत, संजना कीर, राजश्री पेरेकर, शैला भगत, नईमा सय्यद, अनिल चोपडा, मुख्याधिकारी महेश चौधरी आदींसह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी कोण, किती, काळा, गोरा, लठ्ठ, बारीक आहे, हे महत्त्वाचे नाही. तर त्या मुलांमध्ये असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर तो खूप मोठा व्यक्ती बनू शकतो. त्यामुळे मुलांनो मोठे होण्यासाठी खूप खेळा, खूप हसा, खूप अभ्यास करा, व्यायाम करा, परिश्रम घ्या, जेणेकरून आत्मविश्वास निर्माण होईल. शरीर सुदृढ ठेवायचे असेल, तर चॉकलेट खाण्यापेक्षा चांगला आहार घ्या. तरच बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले.
इंडियन मेडिकल असोसिएशन, रायगड मेडिकल असोसिएशन, तसेच अलिबाग तालुका औषधे विक्र ेता संघ यांच्या सहकार्यातून चांगल्या कंपनीची औषधे विद्यार्थ्यांना तपासून मोफत वाटप करण्यात आली.