डहाणूतील गोरगरिबांची राॅकेलसाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:46 IST2021-01-03T23:46:29+5:302021-01-03T23:46:35+5:30
तीव्र टंचाई : स्वयंपाक, दिवाबत्तीसाठी डिझेलचा वापर

डहाणूतील गोरगरिबांची राॅकेलसाठी वणवण
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : डहाणू तालुक्यातील गावखेडोपाड्यांत गेल्या वर्षभरापासून रॉकेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून स्वयंपाक, दिवाबत्तीसाठी लागणाऱ्या रॉकेलसाठी वणवण भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत उज्ज्वला गॅस योजना आणली खरी, मात्र नवे गॅस सिलिंडर आणण्यासाठी आदिवासींकडे पैसे नसल्याने उज्ज्वला गॅस योजनेच्या शेगडी आणि सिलिंडर अनेकांच्या घरांत शोभेच्या बाहुल्या ठरल्या आहेत.
पाच लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात ६० टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकवस्ती आहे. तर, तालुक्यात मोठ्या प्रमाणातील कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असताना जिल्हा पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे वर्षभरापासून रॉकेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. डहाणूत ८५ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. तर, ३२६ किरकोळ रॉकेल विक्रेते आहे. सन २०१९ ला डहाणू तालुक्याला जिल्हा पुरवठा विभागाकडून १३ टँकर रॉकेलपुरवठा केला जात होता. परंतु, वर्षभरात रॉकेलचा पुरवठा वाढण्याऐवजी प्रचंड कपात करण्यात आली. तब्बल एक लाख लीटर रॉकेल कपात झाल्याने गोरगरिबांना रॉकेलसाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
सध्या डहाणू तालुक्याला केवळ ४८ हजार लीटर पुरवठा केला जात असल्याने आदिवासींना डोक्यावर लाकूडफाटीची मोळी उचलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील बहुसंख्य गावात आजही स्वयंपाकासाठी स्टोव्हचा वापर केला जातो. परंतु, गॅस कनेक्शनधारकांना अनुदानित रॉकेल न देण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्यांना पेट्रोलपंपावरून इंधन आणावे लागत आहे. तर, डहाणूच्या दुर्गम भागात पहाटे अंघोळीचे पाणी तापविणे, चूल पेटविणे, संध्याकाळी दिवाबत्तीसाठी रॉकेलची गरज लागते. परंतु, या गोरगरीब आदिवासींच्या रेशनकार्डावर उज्ज्वला गॅस कनेक्शनचा शिक्का असल्याने त्यांना रॉकेल दिले जात नाही. तर डहाणूच्या अतिदुर्गम भागातील दाभाडी, दिवशी, गांगुर्डे, दाभोण, खुबाले, गडचिंचले इत्यादी ठिकाणच्या आदिवासींकडे आजही रेशनकार्ड नसल्याने त्यांना रेशनिंग दुकानातील धान्य किंवा रॉकेल मिळत नाही.
किरकोळ रॉकेल विक्री करणाऱ्या लायसन्सधारकांना गॅस कनेक्शन नसलेल्या शिधापत्रिका लाभार्थ्यांकडून हमीपत्र घेण्यासाठी अनेक वेळा सूचना केली आहे.
- राहुल सारंग,
तहसीलदार, डहाणू