खालापुरातील तळे होणार गाळमुक्त
By Admin | Updated: May 26, 2016 03:05 IST2016-05-26T03:04:52+5:302016-05-26T03:05:45+5:30
पाणीटंचाईच्या झळा आणि विदारक वास्तव रोजचेच समोर येत असताना कोकणातही टंचाईसदृश परिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील खालापूर तालुका राज्याच्या टंचाई कृती

खालापुरातील तळे होणार गाळमुक्त
खालापूर : पाणीटंचाईच्या झळा आणि विदारक वास्तव रोजचेच समोर येत असताना कोकणातही टंचाईसदृश परिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील खालापूर तालुका राज्याच्या टंचाई कृती आराखड्यात असल्याने तालुक्यात मुबलक पाणी असूनही नैसर्गिक आणि कृत्रिम टंचाईने पाण्याची टंचाईजन्य परिस्थिती आहे. यातच खालापूर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावांमधील पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे काम सुरु केल्याने पाण्याचे दुर्भिक्ष दूर होण्यास चांगलीच मदत होणार आहे.
तालुक्यात दोनवत, कलोते, मोरबेसारखी धरणे तर बाळगंगा, पाताळगंगा बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही नैसर्गिक आणि मानवी पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यातील टंचाईवर मात करण्यासाठी तहसीलदारांनी काम सुरु केले आहे. ऐतिहासिक तलावासोबत वावंढळ, गोहे, नंदनपाडा आदि ठिकाणी गावतळे असून अत्कारगाव येथे पाझर तलाव आहे. या तळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढण्यासाठी तहसीलदार अजित नैराळे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत नुकतीच तहसील येथे स्थानिक, शेतकऱ्यांची बैठक घेवून लोकसहभाग घेऊन गाळ काढण्याच्या अभियानाला सुरु वात केली आहे.
मार्चनंतर पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवते यासाठी तत्काळ आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून तळ्यांमधील गाळ उपसा केला तर पाणी साठवणूक क्षमता वाढेल आणि मे महिन्यापर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. फक्त या कामात लोकसहभाग महत्वाचा आहे आणि तो तालुक्यात मिळत आहे. अनेकांनी या कामात मदत केली आहे.
- अजित नैराळे,
तहसीलदार, खालापूर