- आविष्कार देसाईअलिबाग : विकासकामांच्या श्रेयवादावरून आता भाजप आणि शेकाप यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अलिबाग तालुक्यातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेकापनेच प्रयत्न केले आहेत, असा दावा केला आहे. मात्र, अलिबाग-रोहा रस्त्यासाठी २२९ कोटी रुपये, पोयनाड- नागोठणे रस्त्यासाठी ४२ कोटी ७४ लाख रुपये भाजपच्या पुढाकारानेच मंजूर करण्यात आल्याचे अॅड. महेश मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी २ मे २०१९ रोजीच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती नागरिकांना दिल्याचे म्हटले आहे, त्यामुळे आगामी काळात दोन्ही राजकीय पक्षांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून अलिबाग हे हाकेच्या अंतरावर आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून अलिबाग हे पर्यटकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अलिबागमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या नावाने जनतेकडून नेहमीच बोटे मोडली जात आहेत.अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रोहे रस्ता, पोयनाड-नागोठणे या प्रमुख मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांवरून प्रवास करणे अतिशय कठीण झाले आहे. मार्गावर पडलेल्या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे. गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांची अशीच दुरवस्था झालेली असल्याने पर्यटकांनीही अलिबागकडे पाठ फिरवली होती. या विरोधात तालुक्यातील काही कॉटेजेस, हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाकडे दाद मागितली होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलनेही केली होती. त्याचबरोबर विक्रम मिनिडोर चालक-मालक संघटना, आॅटो रिक्षा संघटना यांनीही लक्ष वेधण्यासाठी याच पर्यायाचा उपयोग केला होता. स्थानिकांसाठी तसेच पर्यटन उद्योगाला ब्रेक लागू नये आणि खराब रस्त्यांमुळे अपघात होऊ नये, यासाठी रस्त्यांची सुधारणा होणे गरजेचे होते.अलिबाग-रोहे रस्त्यांसाठी २२९ कोटी, पोयनाड- नागोठणे (२९ कि.मी.) ४२ कोटी ७४ लाख रुपये अलिबाग-रेवस- १२ कोटी रुपये आणि अलिबाग-रेवदंडा रस्त्यासाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी २ मे २०१९ रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती; परंतु हा सर्व निधी आमच्याच प्रयत्नातून आणण्यात आल्याचा सूर आता शेकापने आळवला आहे.शेकापचे आमदार जयंत पाटील आणि आमदार सुभाष पाटील यांनीच हा निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. त्यामुळेच वादाला ठिणगी पडली आहे. निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने विधिमंडळात सातत्याने आवाज उठवला आणि पाठपुरवा केल्यामुळेच कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी सरकारला मंजूर करावा लागल्याचे आमदार सुभाष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.खराब रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना कसा त्रास होतो याची जाणीव झाल्याने तातडीने याबाबतची गंभीरता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर चव्हाण यांनी तातडीने निधी दिला. सदरचे काम हायब्रीड अॅन्युईटीमधील असल्याने ६० सरकार आणि ४० टक्के ठेकेदाराचा हिस्सा होता. मात्र, त्या निविदेला तीन वेळा प्रतिसाद आला नाही. त्यानंतर कामाचे विभाजन करण्यात आले, त्याचे टेंडरही झाले आहे. कामास सुरुवात होणार आहे.याबाबत सर्वप्रथम २ मे २०१९ रोजी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली होती, असे भाजपचे अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. त्यांनी निधी मंजूर केला असता तर आधी माहिती का नाही दिली. त्यामुळे अन्य कोणी यासाठी प्रयत्न केले हा दावाच खोटा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, निवडणुकीचा हंगाम असल्याने आगामी कालावधीत अशा घटनांमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे जनतेची चांगलीच करमणूक होणार आहे.
श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 01:40 IST