सोनसाखळी चोरांना रोखण्यासाठी पोलिसांचा ‘ट्रॅप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:35 IST2019-08-27T23:35:42+5:302019-08-27T23:35:49+5:30
प्रमुख बाजारपेठांमध्ये बसवणार बॅरिकेड्स : दामिनी पथकासह मोबाइल वाहनातून पेट्रोलिंगवर भर

सोनसाखळी चोरांना रोखण्यासाठी पोलिसांचा ‘ट्रॅप’
अलिबाग : काही दिवसांत सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठा चांगल्याच सजल्या आहेत. येत्या कालावधीत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढणार आहे.
या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी (चेन स्नॅचिंग)च्या घटनांमध्ये वाढ होते. त्याला आळा घालण्यासाठी रायगड पोलिसांनी बाजारपेठांच्या येण्या-जाण्याच्या दोन्ही एन्ट्री पॉइंटवर बॅरिकेड्स लावली आहेत. त्याचप्रमाणे या कालावधीत तेथे पोलीस कायमस्वरूपी तैनात करण्यात येणार आहेत. दामिनी पथकांच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याने चोरट्यांवर करडी नजर राहणार आहे.
उत्सवाच्या दरम्यान महिला घराबाहेर पडताना दागिने अंगावर परिधान करतात. मात्र, या दिवसांत सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात वाढ होते. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेत असलेल्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोर दागिने चोरून नेतात. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान असायचे. मात्र, या वर्षी या साºया घटनांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. बाजारपेठांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बाजारपेठ परिसरात चारचाकी वाहन नेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अलिबाग महावीर चौकातील फुलोरा हॉटेल परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ठिकरु ळ नाका, केळकर नाका, शिवाजी चौक, जामा मशीद परिसर, मारु ती नाका अशा बाजारपेठांच्या प्रवेशद्वारावरच हे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. एखाद्या चोरट्याने दागिने लांबवण्याचा प्रयत्न केला तर तो बॅरिकेड्स लावल्यामुळे पळून जाऊ शकणार नसल्याने लगेचच सापडणार आहे.
त्यामुळे या वर्षी उत्सवादरम्यान सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे अलिबाग पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडताना महिलांनी सोन्याचे दागिने घालून बाहेर पडू नये, त्याबरोबरच कोणत्याही मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये, आपल्या हातातील पैशांची पर्स व्यवस्थित सांभाळावी. त्याचप्रमाणे मोफत वस्तू, साड्या वाटत आहेत, अशा भूलथापांना बळी पडू नये, असे केल्यास चोरीच्या घटनांमध्येही घट होण्यास मदत मिळेल.
- के . डी. कोल्हे, पोलीस निरीक्षक, अलिबाग