पोलादपुरातील रस्त्याची दुर्दशा
By Admin | Updated: April 12, 2017 03:51 IST2017-04-12T03:51:07+5:302017-04-12T03:51:07+5:30
तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामधील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झालेल्या कापडे कामथे रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

पोलादपुरातील रस्त्याची दुर्दशा
पोलादपूर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामधील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झालेल्या कापडे कामथे रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर तुर्भे, बोरजफाटा ते देवळे, करंजे, लहुळसे, पितळवाडी ते नानेघोळ रस्ता, लोहारे खोंडा, साखर गोवेले रस्ता देवळे हळदुले आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांनी वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे प्रवासी हैराण झाले असून पावसाआधी दुरुस्ती मागणी करीत आहेत.
पोलादपूरमधील या सर्व मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहनकडून एसटी सेवा सुरू आहे. मात्र, हे रस्ते खराब झाल्याने एसटी सेवेवर त्याचा परिणाम जाणवतो. एसटी पंक्चर होण्याचे, तसेच पाटे तुटणे यामुळे पुढील फेऱ्यांवर परिणाम होऊन ग्रामीण विभागातील जाणाऱ्या गाड्या उशिरा धावतात, तर रस्ते खराब असल्याने खासगी वाहतूक व्यावसायिक एक तर गाडी या गावांना घेऊन जात नाहीत, गेलेच तर भाडे दुप्पट द्यावे लागते.
तालुक्यातील उमरठ हे ऐतिहासिक गाव असून असंख्य इतिहासप्रेमी भेट देत असतात. गेली अनेक वर्षे हा रस्ता कार्यक्र मपुरता तत्पुरता दुरु स्त केला जात होता. मात्र, नुकताच हा रस्ता आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या सातत्याने केलेल्या मागणीला यश आले असून, हा रस्ता पावसाळ्याअगोदर मार्गी लागेल. तालुक्यात घागरकोंड धबधबा, मोरझोत, चंद्रगड,कांगोरी गड,देवळे शिवमंदिर, रामवरदायिनी,वाकन काळकाई मंदिर, कुडपन इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.या स्थळांना जाणारे रस्ते सुस्थितीत ठेवल्यास पर्यटक मोठ्या संख्येने येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तालुक्यातील बहुतेक रस्ते हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहेत.