नेरळमध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ; बिल्डर, ठेकेदाराचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 01:45 AM2019-12-02T01:45:04+5:302019-12-02T01:45:13+5:30

नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये ममदापूर गावाच्या हद्दीत एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.

Play with laborers in Neral; Builder, contractor negligence | नेरळमध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ; बिल्डर, ठेकेदाराचा निष्काळजीपणा

नेरळमध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ; बिल्डर, ठेकेदाराचा निष्काळजीपणा

googlenewsNext

- कांता हाबळे

नेरळ : शहराजवळ मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, बिल्डर लॉबी केवळ आपल्या तुंबड्या भरण्याच्या नादात कामगार, मजूर यांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. केवळ बिल्डर, ठेकेदार व लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्या निष्काळजीमुळे व कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष न दिल्याने अपघात होऊन कामगारांना जीव गमवावा लागत असल्याची भयानक घटना पुन्हा एकदा नेरळ शहराजवळ घडली आहे. दरम्यान, या घटनेची साधी पोलीस ठाण्यात नोंददेखील केली नसल्याने या प्रकाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये ममदापूर गावाच्या हद्दीत एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. २७ नोव्हेंबर रोजी या गृहप्रकल्पाच्या मागील बाजूस नवीन इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना तथा कामगारांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डोक्यावर हेल्मेट, पायात गमबूट, कामगारांचा विमा, अशा कोणत्याही उपाययोजना न करता, अशा स्थितीत काम सुरू होते. त्यामुळे हे काम सुरू असताना मटेरियलने भरलेली लिफ्ट दुसºया मजल्यापर्यंत गेलेली होती. ती लिफ्ट तिथे बसवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, त्याच वेळी खाली या प्रकल्पावर काम करणाºया मजूर महिला कविता राठोड, लक्ष्मी राठोड, कविता अर्जुन पवार या बसल्या होत्या. लिफ्टचे काम सुरू असताना अचानक लिफ्ट खाली कोसळली आणि या तिन्ही महिला
या अपघातात गंभीर जखमी
झाल्या. रुग्णवाहिका बोलावून त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार
सुरू असताना कविता पवार या महिलेची प्राणज्योत मावळली. तर इतर दोघींवर अजूनही उपचार सुरू आहेत.
नेरळ परिसरात गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना ठेकेदार, बिल्डर यांच्या निष्काळजीने मजुरांचा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागल्याची ममदापूर येथील ही सलग तिसरी घटना आहे. एवढे होऊनही या गृहप्रकल्पावर घडलेल्या या अपघाताची पोलीस ठाण्यात साधी नोंददेखील केली गेली नसल्याने या प्रकाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, नेरळ व परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, एवढे अपघात घडूनही इमारत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.
तेव्हा या निष्काळजीचे अजून किती बळी ठरणार? प्रशासन याकडे गंभीरतेने पाहणार का की, मजुरांचे जीव इतके स्वस्त झालेत? हे प्रश्न प्रकर्षाने पुढे येतात.

ेनेरळमध्ये ग्रहप्रकल्पांचे काम वेगाने सुरू
१मुंबईत आलेला माणूस उपाशी मरत नाही, किंबहुना मुंबई त्याला उपाशी ठेवतच नाही, अशी धारणा संपूर्ण भारत देशात असल्याने मुंबईच्या दिशेने अनेकांचा ओढा कायम राहिलेला आहे. त्यातच नेरळ शहर हे मुंबई उपनगरांना जोडले आहे. त्यामुळे इमारत व्यावसायिकांच्या नजरा इकडे वळल्या आणि या ठिकाणी गृहप्रकल्प मोठ्या झपाट्याने उभे राहू लागले.
२गृहप्रकल्प बांधत असताना बिल्डर मजूर ठेकेदाराला ठेका देऊन त्याची माणसे कामाला घेतो. घर सावरण्यासाठी जीवतोड मेहनत करणाºया या मजुरांना दिवसभर राबून अत्यल्प स्वरूपाचा मोबदला मिळतो. मात्र, मजूर ठेकेदार या मजुरांची सुरक्षितता याकडे जरासुद्धा ढुंकून बघत नाही. होतेय ना म्हणून मग बिल्डरसुद्धा मजूर ठेकेदाराला काही बोलत नाही, अशी वास्तव परिस्थिती आहे.

नेरळ विकास प्राधिकरणाकडून इमारत बांधकामाला परवानगी दिली जाते. दिलेल्या परवानगीनुसार काम होत नसेल तर प्राधिकरण कारवाई करते. मात्र, ममदापूर येथे ज्याप्रमाणे अपघात घडला आहे. त्यानुसार प्राधिकरणाला कारवाईचा काही अधिकार नाही, त्या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी ही त्या विकासकाची आहे.
- प्रवीण आचरेकर, तांत्रिक अधिकारी,
नेरळ विकास प्राधिकरण

नेरळ येथे घटना घडल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात कळवायला हवे होते; परंतु रुग्णालयात नेण्यासाठी कदाचित धावपळ केली असेल. मात्र, जखमी मृत झाल्यानंतर तेथून पोलिसांना कळवायला हवे होते. घटना घडून २४ तास उलटले तरी कळविण्यात आले नाही. मात्र, पोलीस मृत व्यक्तीची माहिती घेऊन बिल्डरची चौकशी करतील आणि त्यात दोषी असलेल्यांवर कारवाई करतील.
- अविनाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

इमारतीच्या बांधकामासाठी जे कामगार काम करतात त्यांना हेल्मेट, हातमोजे, गमबूट, अशा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून साहित्य बांधकाम व्यावसायिकाने उपलब्ध करून दिले पाहिजे. त्याचबरोबर कामगारांचा विमा अत्यावश्यक आहे. तो नसल्यास तो काढून घेणे हेही
गरजेचे आहे.
- जब्बार सय्यद, अध्यक्ष,
नाका कामगार युनियन

बांधकाम मजुरांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वगैरे साहित्य पुरविणे गरजेचे आहे. त्यांचे विमे काढले गेले पाहिजेत. मात्र, आपल्या तुंबड्या भरून मजुरांचे जीव कवडीमोल समजून त्यांच्या जीवाशी खेळणाºया मजूर ठेकेदार व बिल्डर लॉबी यांनी यापुढे मजुरांची सुरक्षितता यांना महत्त्व द्यावे. अन्यथा त्यांचे प्रकल्प सुरक्षित राहणार नाहीत याची तजवीज महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल.
- अंकुश शेळके, कर्जत तालुकाध्यक्ष. मनसे

Web Title: Play with laborers in Neral; Builder, contractor negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड