शेलू गावातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था
By Admin | Updated: June 23, 2016 03:24 IST2016-06-23T03:24:38+5:302016-06-23T03:24:38+5:30
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील रस्त्यांची अवस्था पहिल्याच पावसात अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यांमधून चालताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे.

शेलू गावातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था
नेरळ : कर्जत तालुक्यातील शेलू गावातील रस्त्यांची अवस्था पहिल्याच पावसात अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यांमधून चालताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने काही भागात डागडुजी करण्याचे काम सुरु केले आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येचा विचार करता शेलू हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव अशी शेलू गावची ओळख आहे. परंतु शेलू गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. अनेक वर्षे या रस्त्यांची दयनीय अवस्था असताना चांगल्या दर्जाचे रस्ते करण्यात कोणी पुढाकार घेतला नसल्याचे यावरून दिसून येत आहे. आधीच बकाल अवस्थेत असलेल्या या रस्त्यांची पहिल्या पावसातच इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, या चिखलातून रस्ता शोधावा लगता आहे. शेलू येथे रेल्वे स्टेशन असल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. लोकप्रतिनिधींनी रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन रस्त्यांची समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)