प्रदूषित सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन फुटली
By Admin | Updated: July 24, 2015 03:21 IST2015-07-24T03:21:36+5:302015-07-24T03:21:36+5:30
महाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी सामायिक प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर ओवळे गावानजीक सावित्री खाडीत

प्रदूषित सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन फुटली
सिकंदर अनवारे , दासगाव
महाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी सामायिक प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर ओवळे गावानजीक सावित्री खाडीत सोडले जाते. प्रदूषित सांडपाणी वाहून नेणारी ही पाइपलाइन सांडपाणी सोडण्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतर आधीच फुटली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही पाइपलाइन फुटली असून यामुळे लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी खाडीत विहीत ठिकाणाअगोदर मिसळले जात आहे. यामुळे खाडीपट्ट्यात जाणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाड औद्योगिक वसाहत प्रशासन या दुरुस्तीच्या कामाकडे चालढकल करीत आहे.
महाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून सोडले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी औद्योगिक वसाहतीतील सामायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रात एकत्रित केले जाते. या ठिकाणी त्यावर प्रक्रि या करून त्या सांडपाण्याचा घातकपणा कमी केला जातो. कितीही प्रक्रि या केली तरी हे घातक रसायनयुक्त सांडपाणी नागरी वस्तीच्या भागात सोडण्याएवढे चांगले होत नसल्याने समुद्र भू-विज्ञान शाखेने हे सांडपाणी समुद्राच्या खोल भागात सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार हे पाणी आंबेत खाडीत सोडणे गरजेचे आहे. मात्र गेली अनेक वर्षे महाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे हे सांडपाणी आंबेत ऐवजी ओवळे गावानजीक सोडले जात आहे.
ओवळे गावच्या हद्दीतील या विहीत ठिकाणापासून काही अंतर आधीच ही पाइपलाइन फुटली आहे. ही पाइपलाइन फुटून अनेक दिवस उलटून गेले तरी महाड औद्योगिक वसाहत प्रशासनाकडून अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी विहीत ठिकाणापूर्वी खाडीत मिसळले जात आहे. रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी महाड औद्योगिक वसाहत ते आंबेत अशी सिमेंट काँक्रि टची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन फुटून हे प्रदूषण होत आहे. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. खाडीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे जर हे प्रदूषित सांडपाणी योग्य प्रकारे खाडीत मिसळले नाही आणि भरतीच्या पाण्यासोबत खाडीलगतच्या शेतात शिरले तर शेतीचे नुकसान होण्याची भीती नाकारता येत नाही. (वार्ताहर)