जिल्ह्यातील बँकांमध्ये दीडशे कोटींचा भरणा
By Admin | Updated: November 11, 2016 03:22 IST2016-11-11T03:22:01+5:302016-11-11T03:22:01+5:30
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर गुरुवारी आपल्याकडील ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँक खात्यात भरण्यासाठी बँका सुरू होण्याआधीच

जिल्ह्यातील बँकांमध्ये दीडशे कोटींचा भरणा
जयंत धुळप, अलिबाग
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर गुरुवारी आपल्याकडील ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँक खात्यात भरण्यासाठी बँका सुरू होण्याआधीच सकाळी आठ वाजल्यापासून खातेदारांनी रांगा लावल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील २५ बँकांच्या विविध ठिकाणच्या ४२३ आणि सहा अर्बन बँकांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत ५०० आणि १००० मूल्याच्या नोटांचा तब्बल १५० कोटी रुपयांच्यावर भरणा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ५८ शाखांमध्ये दिवसभरात १९ कोटी रुपयांच्या ५०० व १०००च्या नोटा जमा झाल्या असल्याची माहिती रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली. तर कोकणातील सर्वात मोठी अर्बन बँक असणाऱ्या अॅड. अण्णासाहेब सावंत महाड अर्बन बँकेच्या २० शाखांमध्ये एकूण ७ कोटी रुपयांच्या नोटांचा भरणा झाला असल्याची माहिती या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत ओजाळे यांनी ‘लोकमत’ला दिली. अलिबाग मुख्य पोस्ट आॅफिसमध्ये सुमारे १७ कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्टेट बँकेत ४००० खातेदारांची गर्दी
विविध बँकांची धनादेश निर्गती (क्लिअरिंग) बँक असणाऱ्या येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेत तसेच श्रीबाग सेवा शाखेत आज खातेदारांना सत्वर सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता विशेष अतिरिक्त काऊंटर्स उघडण्यात आले होते. अलिबागच्या स्टेट बँकेत नियमित आर्थिक व्यवहार काळात सुमारे १२०० खातेदार दररोज येत असतात. पंरतु गुरुवारी ५०० व १००० रुपयांच्या रद्द करण्यात आलेल्या नोटा खात्यात भरणा करण्याकरिता ४ हजारच्या वर खातेदारांनी बँकेत हजेरी लावल्याची माहिती स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकारी एस.एन.लखोटे यांनी दिली. गुरुवारी बँकांची सेवा संध्याकाळी सात वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआय कडून प्राप्त झाल्याने संध्याकाळी सात अखेर ही खातेदार संख्या पाच हजारपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
केवळ ४ हजार रुपये काढण्याची खातेदारांना मुभा
जुन्या नोटा खात्यात भरणा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात झालेली खातेदारांची गर्दी, त्यात बँकेच्या दारात तासन्तास उभे राहावे लागल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत होती. इतके सारे होवूनही १०० रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने केवळ ४००० रुपये खात्यातून काढण्याची मुभा आणि बंद असलेली एटीएम सेवा या सर्व पार्श्वभूमीवर बँक खातेदारांनी गुरुवारी अत्यंत संयमी भूमिका स्वीकारल्याची माहिती यशवंत ओजाळे यांनी दिली.
खातेदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया
नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेताना, नव्या नोटा आधी तैनात ठेवणे गरजेचे होते. परंतु तसे झालेले नाही याचा अर्थ हा अत्यंत गुप्त नियोजनाचा भाग असणार अशी प्रतिक्रिया आयडीबीआय बँकेच्या रांगेत उभे खातेदार दशरथ म्हात्रे यांनी दिली. नोटा रद्द केल्यावर निदान एटीएममधील मशीन्समध्ये नोटा भरुन त्या खातेदारांना उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले असते तर सर्वच बँकांवर एकाच वेळी ताण येवून खातेदारांना रजा टाकून रांगेत उभे राहण्याची वेळ आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया मोहन रावकर या तरुण खातेदाराने व्यक्त केली. देशाची सुरक्षितता लक्षात घेतली पाहिजे परंतु त्याकरिता थोडीशी कळ सोसण्याची मानसिकता मात्र ठेवायची नाही, अशी अत्यंत सूचक प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक तथा निवृत्त सरकारी अधिकारी आर. के. देवळे यांनी व्यक्त केली.
बँकांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यातील सर्व बँकांच्या सर्व शाखांच्या परिसरात गुरुवारी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे सर्वांना बँक व पोस्ट आॅफिसमधून जुन्या नोटा बदलून नवीन नोटा दिल्या जाणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत बँकेत असलेल्या आपल्या खात्यात जुन्या नोटा जमा करता येणार, तसेच ४ हजार रुपये रोख लगेच बदलून मिळणार आहेत.
या काळात बॅग चोर पाळत ठेवून संधी पाहून बॅग हिसकावून घेतल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे टाळण्याबाबत पोलीस विभाग सतर्क आहे. नागरिकांनीही याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी केले आहे.
बाजारपेठेवर दुसऱ्या दिवशीही मंदीचे सावट
नागोठणे : बँका उघडण्यापूर्वीच गुरुवारी ग्राहकांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच गर्दी केल्याने बँक उघडल्यानंतर प्रचंड गर्दीमुळे काही काळ बँकांची सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र होते. त्यात रद्द झालेल्या नोटांच्या बदली देण्यासाठी नव्याने आलेल्या नोटा दुपारपर्यंत तरी उपलब्ध झाल्या नसल्याने ग्राहकांना १00रुपयांच्या आतील नोटा स्वीकारून समाधान मानावे लागत होते. बाजारपेठेत सुद्धा ग्राहकांना देण्यासाठी दुकानदारांकडे सुटे पैसेच राहिले नसल्याने दुसऱ्या दिवशीही बाजारपेठेत मंदीचे सावट आले होते.
सामान्य जीवनावर परिणाम
1कार्लेखिंड : जुन्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सामान्य वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. काबाडकष्ट करून मिळविलेला पैसा जर कामी नाही आला तर त्याचा परिणाम जनजीवनावर होण्याची शक्यता आहे. सकाळपासून तरुणांपासून ते वयस्कर महिला आणि पुरुष गर्दीमध्ये उन्हातून उभे राहताना दिसले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ताण जाणवत होता. 2नोटा बंदमुळे पेट्रोल पंप तसेच भाजी विक्रेते आणि चहाची टपरी यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. पेट्रोल पंपावर वाद होताना दिसले. कारण एखाद्या ग्राहकाला शंभर किंवा पाचशे रुपयांच्या आत पेट्रोल भरायचे असल्याचे ग्राहकाला पेट्रोल भरता येत नाही. पंपावरील कर्मचारी म्हणतात, आमच्याकडे सुटे पैसे नाहीत. त्यामुळे काही वाहन चालकांना इच्छा नसतानाही पाचशे रुपयांचे पेट्रोल भरावे लागत आहे.
पॅनकार्ड आवश्यक
रेवदंडा : रेवदंड्यात अनेक बँकांमध्ये चार हजार रुपयांपर्यंतच रक्कम बदलून मिळत असल्याने ग्राहकांनी गर्दी केली होती. रक्कम जमा करताना पॅनकार्ड आवश्यक असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. बँकांमध्ये गर्दी वाढल्याने अनेकांनी आपला मोर्चा टपाल कार्यालयात वळविला. परंतु तेथे मुख्य टपाल कार्यालयातून नोटाच न आल्याचे निदर्शनास आले.
रेवदंडा टपाल कार्यालयातील कर्मचारी इस्माईल हमदुले यांच्याकडे विचारणा केली असता, गुरुवारी चलनातून
रद्द केलेल्या नोटांची सुमारे पाच लाख रुपये रक्कम
जमा झाली आहे. मुख्य
टपाल कार्यालयातून शंभर किंवा अन्य चलनातील नोटा न आल्याने नागरिकांना
नाराज होऊन परतावे
लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुट्या पैशांवरून किरकोळ वाद
पनवेल : पनवेल शहरात विविध बँकांमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पैसे भरणा आणि काढण्यावरून ठिकाणी किरकोळ वाद झाले. ठिकठिकाणी बँकांसमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाचशे, हजारच्या नोटांचा भरणा करण्यासाठी पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी तसेच ग्रामीण भागातील बँकांमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारनंतर मात्र बँकांतील गर्दी कमी झाली. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असता एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांची निराशा झाली. नागरिकांकडे सुटे पैसे नसल्यामुळे मोठी अडचण झाली होती. काहींनी नव्या नोटा काढून त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले.