भिसे खिंडीतील रस्त्यावरील संरक्षक कठडे तुटले
By Admin | Updated: May 23, 2016 03:06 IST2016-05-23T03:06:21+5:302016-05-23T03:06:21+5:30
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे आणि रोहा या दोन शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीतील रस्त्यावरील तुटलेले संरक्षक कठडे

भिसे खिंडीतील रस्त्यावरील संरक्षक कठडे तुटले
मुरुड / बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे आणि रोहा या दोन शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीतील रस्त्यावरील तुटलेले संरक्षक कठडे आणि धोकादायक वळणावरील वाढलेल्या झुडपामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.
भिसे खिंडीतील रस्ता हा नेहमीच रहदारीचा असून हा रस्ता डोंगरामधून गेलेला आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास किंवा इतर कारणांनी अपघात झाला तर मोठी भयानक परिस्थिती निर्माण होईल. या खिंडीतील अनेक ठिकाणी असलेले संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत असून खिंडीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. याच्या बाजूला असणारी वृक्षांची वाढलेली झुडपे ही रस्त्यावर आली आहेत. वाढलेल्या झुडपांमुळे वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे बनले आहे. काही दिवसांनी पावसाचे आगमन होणार असून त्यावेळी ही झुडपे आणखी मोठ्या प्रमाणात वाढतील, तरी संबंधित विभागाने वाढलेली झुडपे तोडून टाकावी आणि तुटलेल्या संरक्षक कठड्याची दुरु स्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. रोहा हे तालुक्याचे ठिकाण तसेच नागोठणे हे राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे नागोठणे विभागातील नागरिक हे शासकीय कामानिमित्त येत असतात. त्यांना रोहा येथे येण्यासाठी भिसे खिंडीतून यावे लागते किंवा नागोठणे -कोलाड नाका मार्गे रोहा असा वळसा घालून यावे लागत आहे. त्याचप्रमाणे नागोठणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय, रिलायन्ससारखे औद्योगिक प्रकल्प, अनेक उद्योग व्यवसाय असल्याने या भिसे खिंडीतून नागरिकांची कामधंद्यानिमित्त दिवस-रात्र ये-जा सुरू असते.या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. खिंडीतील धोकादायक नागमोडी वळणावरील तुटलेल्या अवस्थेतील संरक्षक कठडे आणि वृक्षांची वाढलेली झुडपे यामुळे ये- जा करणाऱ्या वाहन चालकांसहित नवीन वाहनचालक यांनाही समोरून येणारे वाहन बहुतांशी दिसत नाही. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संरक्षक कठडा तुटलेल्या ठिकाणी अपघात झाला तर वाहन हे थेट खोल दरीत कोसळण्याची भीती आहे. तरी संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देवून सहकार्य करण्याची मागणी प्रवाशांसहित वाहन चालकांकडून होत आहे. (वार्ताहर)