खड्डेमय रस्त्याने प्रवासी त्रस्त
By Admin | Updated: May 1, 2017 06:34 IST2017-05-01T06:34:49+5:302017-05-01T06:34:49+5:30
रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवदंडा रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच कष्टमय प्रवास

खड्डेमय रस्त्याने प्रवासी त्रस्त
बोर्ली-मांडला/मुरुड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवदंडा रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच कष्टमय प्रवास करावा लागत आहे. मात्र, याबाबत बांधकाम विभाग व ठेकेदारांना कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे पर्यटकांची संख्या रोडावत आहे. अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-मांडव या मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रवास करणाऱ्यांना पाठदुखी कंबरदुखी यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. या रस्त्याबाबत सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मोर्चे, आंदोलने केली आहेत. मात्र, काहीही उपयोग झाला नाही, त्यामुळे आता पावसाआधी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
अलिबाग रेवदंडा रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. अजूनही ते रस्ते पूर्णत्वास आलेले नाही. खारगल्ली ते आक्षी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. आतापर्यंत फक्त निम्म्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या काळात २८ दिवस काम बंद ठेवण्यात आले होते. सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल की नाही, अशा संभ्रमात नागरिक आहेत.
खारगल्लीपासून ते पुढे चौल आणि चौल ते बाह्यवळण रेवदंडा पूल पर्यंतचा रस्ता हा खड्डेमय आहे. त्या रस्त्याचे खडीकरण काम सुरू केले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत काम घेतलेले ठेकेदार हे संथगतीने काम करीत आहेत. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारीही याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. हीच परिस्थिती अलिबाग-रोहाची आहे.
अलिबाग तालुक्यातील या रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे राजकीय पक्ष हे मोर्चे काढून बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला विचारणा केली. मात्र, अधिकारी फक्त आश्वासन देऊन वेळ मारून नेतात. या सर्व प्रकारात प्रवासी मात्र खड्डेमय प्रवास कधी संपणार याच प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)
मुरूड- अलिबाग रस्त्याची दुरवस्था
मुरु ड ते अलिबाग या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून खड्ड्यातून रोज प्रवास करावा लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. नागाव आक्षी या रस्त्याचेही हेच सुरु असल्याने मुरु ड येथून अलिबाग मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेस या वावे मार्गे जात आहेत.
रायगड जिल्ह्यातील इतर काही रस्ते तयार झाले; परंतु या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांची जीवनवाहिनी असलेली एसटी या मार्गावर धावत असली तरी यामुळे एसटीचे नुकसान होत आहे.
येथील काही रस्त्याला फक्त डांबरीकरण केले तरी हे रस्ते सुस्थितीत होऊ शकतात; परंतु सार्वजनिक बांधकाम खाते यावर कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही.
कोणताही राजकीय नेता या रस्त्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांचे देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला आता कोणीही वाली राहिला नाही.
यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दोन ते तीन महिन्यांवर पावसाळा आला असूनसुद्धा या रस्त्याबाबत बांधकाम खात्याची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट न झाल्याने हे रस्ते होणार तरी कधी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
खारगल्लीपासून ते पुढे चौल आणि चौल ते बाह्यवळण रेवदंडा पूल पर्यंतचा रस्ता हा खड्डेमय झाल्याने खडीकरण काम सुरु केले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे.
मुरु ड ते अलिबाग हे अंतर ४८ किलोमीटर असून एसटीने प्रवास केल्यास अलिबाग येथे पोहोचण्यासाठी अडीच तास लागतात, तर खासगी गाडीने दोन तास लागतात.
वावे मार्गे प्रवास करावा लागत असल्याने व येथे खड्डे असल्याने या ठिकाणी पोहोचण्यास खूप वेळ लागत आहे. रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे, असे बांधकाम अधिकारी यांच्याकडून समजते; परंतु आलेला निधी रस्त्यावर खर्च होताना दिसत नसल्याने हे रस्ते होणार तरी कधी? हा प्रश्न येथे नागरिकांकडून विचारला जात आहे.
मुरु ड ते साळाव हा रस्ता १९९२ साली तयार करण्यात आला. हे अंतर ३२ किलोमीटर एवढे आहे; परंतु आजतागायत या रस्त्याचे कधीच डांबरीकरण न केल्याने, आता हेसुद्धा रस्ते खराब झाले आहेत.