दीड कोटींचे खाद्यपदार्थ जप्त
By Admin | Updated: October 27, 2016 03:27 IST2016-10-27T03:27:01+5:302016-10-27T03:27:01+5:30
आरोग्यदायी दिवाळीकरिता रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून विशेष सतर्कता मोहीम जिल्ह्यात अमलात आणली आहे. गेल्या २५ दिवसांत

दीड कोटींचे खाद्यपदार्थ जप्त
अलिबाग : आरोग्यदायी दिवाळीकरिता रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून विशेष सतर्कता मोहीम जिल्ह्यात अमलात आणली आहे. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून आतापर्यंत १ कोटी ४४ लाख ६१ हजार २३४ रुपये किमतीचा आरोग्यास अपायकारक मालाचा साठा जप्त केला. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
दिवाळी सणाच्या निमित्ताने घरोघर लाडू, चिवडा, करंजी, चकली असे गोड-तिखट विविध पदार्थ आवर्जून तयार केले जातात. दिवाळीच्या या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यास घातक अशा खाद्यपदार्थांची विक्री छुप्या पद्धतीने बाजारात केली जाते. अशा आरोग्यास घातक पदार्थांमुळे आरोग्यास अपाय झाल्याची उदाहरणे देखील यापूर्वी निष्पन्न झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ही विशेष मोहीम जिल्ह्यात अमलात आणण्यात आली आहे. १ कोटी ४४ लाख ६१ हजार २३४ रुपये किमतीच्या आरोग्यास अपायकारक मालाच्या या साठ्यामध्ये १ कोटी ३६ लाख ७९ हजार २४५ रुपये किमतीचे खाद्यतेल, ६ लाख ३२ हजार ३९९ रुपये किमतीची इन्स्टंट टी पावडर, १ लाख ४५ हजार १२२ रुपये किमतीचे सिट्रीक अॅसिड, ३ हजार ६८ रुपये किमतीचे खाद्यरंग आणि १ हजार ४०० रुपये किमतीची तयार मिठाई यांचा समावेश असल्याचे संगत यांनी सांगितले.
आरोग्यास अपायकारक असण्याची शक्यता विचारात घेवून जिल्ह्यातून विविध खाद्यपदार्थांचे एकूण ६७ नमुने घेण्यात आले असून, ते परीक्षणाकरिता रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.प्रयोगशाळेच्या अहवालात आरोग्यास घातक निष्पन्न होणाऱ्या नमुन्यांच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ६७ घेतलेल्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक २५ नमुने हे खाद्य तेलाचे आहेत, तर उर्वरित १० दुधाचे, चार मिठाईचे, एक खव्याचा, दोन मसाल्याचे, ३ बेसन(चणा पिठाचे), चार रवा-मैद्याचे, दोन फ्रूट कलरचे, एक नमकीनचा, तीन फळांचे तर अन्य चार नमुने असल्याचे संगत यांनी सांगितले. दिवाळीच्या काळात जनतेकडून मोठ्या प्रमाणात मिठाई व तयार अन्नपदार्थ यांची खरेदी होवून त्याचे सेवन होत असते. मिठाई व इतर अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन संगत यांनी जनतेस केले आहे.
शंका आल्यास सत्वर संपर्क साधा
मिठाई खरेदी करताना कोणत्याही प्रकारची शंका आल्यास सहाय्यक आयुक्त (अन्न) (रायगड-पेण), अन्न व औषध प्रशासन, दूरध्वनी क्रमांक ०२१४३/२५२०८४ व २५२०८५ येथे वा टोल फ्री क्र. १८००२२२३६५ येथे नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी अखेरीस केले आहे.
नागरिकांना आवाहन : मिठाई व इतर अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी जनतेस केले आहे.