किल्ला गावात वृद्ध महिलेचा खून; ग्रामस्थांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:44 IST2019-06-05T23:44:13+5:302019-06-05T23:44:28+5:30

धक्कादायक प्रकाराने परिसर हादरला

Old woman's murder in the fort Panic in the villagers | किल्ला गावात वृद्ध महिलेचा खून; ग्रामस्थांमध्ये घबराट

किल्ला गावात वृद्ध महिलेचा खून; ग्रामस्थांमध्ये घबराट

धाटाव : रोहा तालुक्यातील किल्ला गावात वृद्ध महिलेचा मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने खून के ला. पोलीस तपास यंत्रणा कसोशीने या फरार आरोपीचा शोध घेत आहे. हा प्रकार मध्यरात्री घडल्याने या खुनाचे वृत्त पहाटे वाऱ्यासारखे पसराताच संपूर्ण परिसर मात्र हादरला. या धक्कादायक दुर्घटनेमुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

किल्ला गावातील शंकर रामजी बामुगडे व अरुणा शंकर बामुगडे हे घरात झोपले होते. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने ६७ वर्षीय वृद्ध महिला अरुणा बामगुडे यांच्या मानेवर व डोक्यावर धारदार शस्राने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या अरुणा बामुगडे यांचे पती शंकर बामुगडे रात्री लघुशंकेसाठी उठले असता त्यांच्या निदर्शनास हा धक्कादायक प्रकार आला. आपल्या पत्नीचा खून केल्याचे समजताच सर्वत्र आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक परदेशी यांनी तातडीने किल्ला येथील घटनास्थळी धाव घेतली. वृद्ध महिलेच्या हत्येचे गांभीर्य लक्षात घेताच अलिबाग येथून श्वानपथक किल्ला गावात दाखल झाले. प्राथमिक तपासातून हा खून असल्याचे समोर आले आहे. मात्र, या खुनाबाबत किल्ला गावातील ग्रामस्थांमध्ये शंका उपस्थित होताना दिसत आहेत.

मंगळवारी रात्री ११ ते २ दरम्यान ही घटना घडली आहे. हा तपासाचा भाग आहे. वृद्धेची हत्या कोणी आणि का केली हे लवकरच समोर येईल. आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत. लवकरच आरोपीला शोधून काढू. - अमोल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी

Web Title: Old woman's murder in the fort Panic in the villagers