अवघ्या पाच गुंठ्यांत भेंडीचे घेतले भरघोस उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 12:50 AM2021-05-05T00:50:24+5:302021-05-05T00:50:41+5:30

उद्धर येथील शेतकरी तुषार केळकर यांचा प्रयोग

Okra yields in just five goons | अवघ्या पाच गुंठ्यांत भेंडीचे घेतले भरघोस उत्पन्न

अवघ्या पाच गुंठ्यांत भेंडीचे घेतले भरघोस उत्पन्न

Next

विनोद भोईर

पाली : सुधागड तालुक्यातील उद्धर येथील तरुण प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर यांनी सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या पाच गुंठ्यांतून ते भेंडीचे बंपर उत्पादन मिळवीत आहेत. सध्या दिवसाला ३० किलो भेंडी निघत आहे.

केळकर यांनी आपल्या शेतातील साधारण पाच गुंठे जमिनीची मशागत केली. जमीन नांगरली, बेडणी केली, मातीची भर घातली. त्यामध्ये शेणखत, अमृतपाणी, कोंबडीची विष्ठा, नत्र, पोटॅश, फॉस्फेट, आदी सेंद्रिय व रासायनिक घटकांचा (खतांचा) योग्य मेळ घातला. त्यातही पोटॅश व फॉस्फेट अगदी कमी प्रमाणात वापरला असल्याचे तुषारने सांगितले आणि भेंडीच्या २०० रोपांची लागवड केली. साधारण ४५ दिवसांनी भेंडी येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीचे ४-५ दिवस उत्पादन कमी मिळाले; पण मागील ४ दिवसांपासून रोज किमान २५ ते ३० किलो भेंडी रोज मिळत आहे. ही भेंडी पाली बाजारात भाजीवाल्यांना २५ ते ३० रुपये होलसेल दराने विकली जाते, तर तुषार व त्यांची पत्नी शेजारील गावांमध्ये जाऊन भेंडीची किरकोळ विक्रीदेखील करतात.

रोज मिळते ३५ किलो भेंडी 

सध्या दर दिवशी ३५ किलो भेंडी निघते. काही दिवसांत उत्पादन वाढेल. तेव्हा दिवसाला ५० किलो उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. अजून दीड महिने उत्पन्न मिळणार आहे. त्यानंतरही दुसऱ्या जागेवर भेंडी लावली जाणार आहे.

शेतीत नवनवीन प्रयोग करणे, चांगली मशागत, योग्य नियोजन व मेहनत यामुळे हे शक्य झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी देखील अशा प्रकारे शेती केल्यास भरघोस उत्पादनाबरोबरच चांगले उत्पन्न देखील मिळेल.
- तुषार केळकर, 
तरुण प्रयोगशील शेतकरी

Web Title: Okra yields in just five goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.