नवीन नळजोडणीस शहरवासीयांचा विरोध
By Admin | Updated: October 1, 2015 23:46 IST2015-10-01T23:46:57+5:302015-10-01T23:46:57+5:30
मुरुड नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाने सर्व नळधारकांना नोटीस पाठवून नवीन वितरण लाइनवरुन कनेक्शन घेणे बंधनकारक केल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे.

नवीन नळजोडणीस शहरवासीयांचा विरोध
नांदगाव : मुरुड नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाने सर्व नळधारकांना नोटीस पाठवून नवीन वितरण लाइनवरुन कनेक्शन घेणे बंधनकारक केल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन वितरण लाइनवरुन पाणी घेताना या जोडणीचा खर्च सुमारे चार ते पाच हजार रुपयांपर्यंत होत आहे. तो खर्च नागरिकांना करावयाचा असल्यामुळे याचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागणार आहे. जुन्या वितरण व्यवस्थेकडून सुरळीत पाणीपुरवठा होत असताना नवीन वितरण व्यवस्थेची सक्ती करु नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
याबाबतचे निवेदन भोगेश्वर आळी उत्तर विभाग येथील नागरिकांनी मुख्याधिकारी वंदना गुळवे यांना दिले. शासनाच्या फंडातून अंबोली धरणांतर्गत मुरुड शहरासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली होती. यासाठी सरकारने ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्ची करुन सुद्धा नवीन जोडणीचा खर्च का? असा प्रश्न या निवेदनाव्दारे मुरु ड नगरपरिषद प्रशासनास नागरिकांनी केला आहे.
मुरुड शहरासाठी अंबोली धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यामध्ये धरणापासून ते ग्राहकांपर्यंत पाणी पोहचवण्याचा सर्व खर्च अपेक्षित धरुनच केला आहे. हा खर्च नळधारकांकडून घेणे योग्य आहे का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. भोगेश्वर आळीमध्ये सर्व नळधारक नवीन नळजोडणीस येणारा खर्च करू शकत नाहीत, तरी नगरपरिषदेने स्वखर्चाने नवीन नळजोडणी करुन द्यावी, अशी आग्रही मागणी शहरी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष रहिम कबले व गटनेते महेश भगत यांना देण्यात आले. यावेळी भोगेश्वर पखाडीतील प्रकाश विरकूड, उदय चौलकर, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)