बेलापूरसह वाशीमध्ये विशेष उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:31 PM2020-10-01T23:31:04+5:302020-10-01T23:31:17+5:30

नेरूळ पूर्वमध्येही रुग्ण वाढले : झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात सातत्यपूर्ण यश; ८ ठिकाणी जनजागृतीची आवश्यकता

Need for special measures in Vashi including Belapur | बेलापूरसह वाशीमध्ये विशेष उपाययोजनांची गरज

बेलापूरसह वाशीमध्ये विशेष उपाययोजनांची गरज

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ‘ब्रेक द चेन’ अभियानास यश येऊ लागले आहे. ८ पैकी ६ विभाग कार्यालय परिसरांत अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या घटली आहे. बेलापूर, वाशी व नेरूळ पूर्व या परिसरात मात्र रुग्णसंख्या वाढली असून, तेथे विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात सातत्य राखण्यात यश प्राप्त झाले आहे. २३ पैकी ८ नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात रुग्णसंख्या वाढली असून, तेथे व्यापक जनजागृती करावी लागणार आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. ब्रेक द चेन व मृत्युदर नियंत्रणात आणण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या अभियानामध्ये विभाग कार्यालय व नागरी आरोग्य केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या दोन्हींच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणाचे काम केले जात आहे. विभाग अधिकारी व नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख या सर्वांशी आयुक्त सातत्याने संपर्क ठेवत असून, कामकाजाचा आढावा घेत आहेत.
१५ आॅगस्ट ते २८ सप्टेंबरदरम्यानच्या शिल्लक रुग्णांचा आढावा घेतल्यास ८ पैकी ६ विभाग कार्यालय परिसरात रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले आहे. बेलापूर व वाशी विभाग कार्यालय परिसरात शिल्लक रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. नेरूळ पूर्वमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. या परिसरामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील २३ पैकी १५ आरोग्य केंद्रांच्या परिसरात रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले आहे. ८ ठिकाणी शिल्लक रुग्णसंख्या वाढली असून, त्या ठिकाणीही जनजागृती वाढवावी लागणार आहे.
नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने प्रत्येक विभागामध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. परंतु काही ठिकाणी नागरिकांचा निष्काळजीपणा वाढत आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे काटेकोर पालन केले जात नाही. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती देणे व कोरोना चाचणी करण्याविषयीही उदासीनता दाखविली जाते. यामुळे काही ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नवी मुंबईमध्ये झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. <
झोपडपट्टी भागात शिल्लक रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असून, या कामगिरीमध्ये सातत्य राहत आहे. शहरातील इतर विभागांमध्येही कामगिरीत सातत्य राहिल्यास नवी मुंबईमधील परिस्थिती लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात तुर्भे स्टोअर्स व तुर्भे सेक्टर २१ च्या परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला होता. शहरातील सर्वाधिक रुग्ण याच परिसरात होते. यानंतर तुर्भे नागरी आरोग्य केंद्रातील
डॉ. कैलास गायकवाड, इतर कर्मचारी, विभाग कार्यालय व या परिसरातील लोकप्रतिनिधी या सर्वांनी व्यापक जनजागृती, नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाची वाढ नियंत्रणात आणली व चार महिन्यांपासून सातत्याने ‘तुर्भे पॅटर्न’ यशस्वी ठरला.

विभाग कार्यालय परिसरातील शिल्लक रुग्णांची संख्या

विभाग १५ आॅगस्ट २८ सप्टेंबर
बेलापूर ५९० ६०५
नेरूळ ७३४ ६३२
वाशी ३४९ ५०८
तुर्भे ४४५ ३८८
कोपरखैरणे ५७४ ५२९
घणसोली ४८२ ३४८
ऐरोली ५४३ ४७०
दिघा ८६ ४२

Web Title: Need for special measures in Vashi including Belapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Raigadरायगड