राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक रिंगणात
By Admin | Updated: November 8, 2016 02:34 IST2016-11-08T02:34:48+5:302016-11-08T02:34:48+5:30
मुरुड नगरपरिषद निवडणुकीत बंडखोर सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांनी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळवली तर तीन नगरसेवकांनी या निवडणूक

राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक रिंगणात
नांदगाव/मुरुड : मुरुड नगरपरिषद निवडणुकीत बंडखोर सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांनी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळवली तर तीन नगरसेवकांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले सहा नगरसेवक यांनी मुरु ड नगरपरिषदेत वेगळा गट स्थापन करून मूळ पक्षाला बाजूला ठेवून शिवसेना व शेकाप नगरसेवकांचे सहकार्य घेत नगराध्यक्ष आपल्या गटाला मिळवले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाशी संबंध दुरावले होते. तद्नंतर व्हीपचा अनादर केला म्हणून रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यपद रद्द करावे यासाठी खटला दाखल करण्यात आला आहे. या घटनेस अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला तरी या सहा नगरसेवकांचे निकाल न लागल्याने अखेर या सार्वत्रिक निवडणुकीत सहापैकी तीन नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
जुने गटनेते महेश भगत यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत प्रभाग ५ (अ) मधून अर्ज दाखल केला आहे. त्यांची लढत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार व आघाडी पुरस्कृत आशिष दिवेकर यांच्या सोबत होणार आहे. आशिष दिवेकर हे नगरपरिषदेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहेत. तरु ण उमेदवार असून ते जुनेजाणते नगरसेवक महेश भगत यांना कशी लढत देतात ते पहावयास मिळणार आहे.ही लढत रोमांचकारी होईल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. दोघात सरळसरळ लढत असून अपात्रतेची टांगती तलवार असताना सुद्धा कोणत्याही अपक्ष अथवा डमी अर्ज नसल्याने हे येथे विशेष दिसून येत आहे. दुसरे उमेदवार अशोक धुमाळ असून हे सुद्धा शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळवली आहे. प्रभाग ६ (अ ) मधून ते नगरसेवक निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विश्वनाथ रणदिवे यांच्या सोबत होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे महेश मानकर, अपक्ष उमेदवार रहीम कबले, अपक्ष नितीन आंबुर्ले आदी मान्यवर उभे आहेत. तर तिसरा उमेदवार ८ (क) मधून मेघाली पाटील या उभ्या असून त्यांची लढत काँग्रेस आय पक्षाच्या उमेदवार शफीना उलडे यांच्या सोबत होणार आहे.त्याच प्रभागातून मंगल जैन (भाजपा) पूजा कासेकर हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत.मात्र या सार्वत्रिक निवडणुकीत माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील, नगरसेवक संदीप पाटील,नगरसेवक उदय भाटकर यांनी माघार घेतली असून त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्रतेची टांगती तलवार असताना सुद्धा तीन नगरसेवक शिवसेनेच्या आश्रयाला जाऊन त्यांनी उमेदवारी सुद्धा मिळवली आहे. काही दिवसांपूर्वीच बंडखोर नगरसेवकांनी मुंबई येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. हे तीन नगरसेवक या निवडणुकीत काय चमत्कार करणार हा मोठ्या औत्सुक्याचा विषय बनला आहे. (वार्ताहर)
भाजपा नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढवणार
नांदगाव/ मुरु ड : नगरपरिषद निवडणूक मुरु ड शहर भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार असून शिवसेनेसोबत युती होणार नसून भाजपा १० नगरसेवक व नगराध्यक्ष पदाची स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, जनार्दन कंधारे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे मुरु ड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उमेश माळी, विनोद भगत, महेश मानकर, दीपक कंधारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
११ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आमच्या पक्षातील कोणीही अर्ज मागे घेणार नाही. आम्ही सर्व जागा लढवणार असून शिवसेना आमच्यासोबत नसल्याचा निर्वाळा यावेळी देण्यात आला. शिवसेनेने युतीसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. शेवटपर्यंत आम्हाला झुलवत ठेवले आहे. त्यामुळे अखेर आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. लोकांनी नवीन चेहऱ्यांना कामाची संधी मिळवून द्यावी, विकासकामे केल्याशिवाय भाजपाचा नगरसेवक स्वस्थ बसणार नाही. पूर्वी सत्ता उपभोगलेल्या लोकांनी फक्त सत्ता उपभोगली, पण जनतेच्या विकासकामाकडे दुर्लक्ष केले आहे. जनता त्यांच्या कारभाराला कंटाळलेली असून आम्हाला निश्चितच काम करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन जनार्दन कंधारे यांनी केले. आरक्षण जागेवर राजकारण करून काही लोकांनी सत्ता उपभोगली. आगामी निवडणुकीत येथील जनता या लोकांना त्यांची जागा निश्चित दाखवेल, असा विश्वास विनोद भगत यांनी व्यक्त केला. पाण्यावर मते मागू नका, आंबोली धरणाचे पाणी दिलेत यावर राष्ट्रवादी पक्षाने सत्ता मिळवली, आता तोच मुद्दा घेऊन जनतेची दिशाभूल करू नका, गेली दोन टर्म याच मुद्यावर आपणास सत्ता मिळाली त्या व्यतिरिक्त कोणतेही ठोस काम राष्ट्रवादी पक्षास करता आलेले नाही. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक फुटून शिवसेनेत गेले. आता निवडून येणारे नगरसेवक सुद्धा इतर पक्षात जातील याचा लोकांनी विचार करावा, असे दीपक कंधारे म्हणाले. यावेळी शहर अध्यक्ष प्रवीण बैकर यांनी जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून महिलांना रोजगार, स्थानिक तरु णांना रोजगार, ग्रामीण रु ग्णालयात अत्याधुनिक सेवा,
स्मशानभूमी सुशोभीकरण,सर्व शहरात एल. इ.डी. दिवे,पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, मुरु ड शहराला मोफत वाय
फाय सेवा,अंतर्गत सुसज्ज रस्ते, स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक आदी आश्वासने
देण्यात आली आहेत.