राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेसची आघाडी
By Admin | Updated: October 28, 2016 03:48 IST2016-10-28T03:48:37+5:302016-10-28T03:48:37+5:30
मुरुड नगरपरिषद निवडणुकीला आता चांगलाच रंग चढला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पक्षाची भरभक्कम आघाडी झाल्याची

राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेसची आघाडी
नांदगाव/ मुरु ड : मुरुड नगरपरिषद निवडणुकीला आता चांगलाच रंग चढला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पक्षाची भरभक्कम आघाडी झाल्याची घोषणा माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार पंडित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. एकूण १५ जागांपैकी ७ राष्ट्रवादी, ५ शेकाप तर ३ जागा काँग्रेस पक्षाला जाहीर केल्या. तसेच आघाडीतर्फेनगराध्यक्ष पदासाठी मुग्धा मंगेश दांडेकर यांची उमेदवारी जाहीर करताच तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.
आमदार पंडित पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या रायगडात जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी आमदार सुनील तटकरे व आमदार जयंत पाटील या नेत्यांनी पुरोगामी विचारसरणीने, सर्व राजकीय मतभेद विसरून आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे. मुरु डला जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ करण्यासाठी निधी उभारणीची शिकस्त करण्याची ग्वाही देत नगरपरिषद निवडणुकीत आघाडीतील १५ नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. मीनाक्षी पाटील म्हणाल्या की, जयंत पाटील व सुनील तटकरे हे धुरंधर नेते आहेत. त्यामुळे पुरोगामी विचार घेऊन सर्वसामान्यांना अच्छे दिन आणण्यासाठी स्वराज्याचे सुराज्य करायच्या निर्धाराने एकत्र आलो आहोत. यामध्ये काँग्रेस पक्षही सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतिक खातिब, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मंगेश दांडेकर, तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष महाडिक आदी उपास्थित होते.
मुरुड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युतीची बोलणी सुरु असल्याचे समजते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख २९ आॅक्टो. असल्याने दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. सन २०११ च्या निवडणुकीत चौरंगी लढत झाली असली तरी राष्ट्रवादीला १५ पैकी १२ जागी निर्विवाद बहुमत मिळाले होते. व्यक्तिगत हेवेदावे बळावल्याने गटनेते महेश भगत यांनी ६ नगरसेवकांच्या सहाय्याने परिषदेचा कारभार सांभाळला होता. परिणामी दोन गट पडले. दोन दिवसांपूर्वीच महेश भगत गटाच्या सहा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे दिले.
मुग्धा दांडेकर यांचे नाव घोषित
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अतिक खतिब यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी मुरु ड नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून मुग्धा दांडेकर यांचे नाव घोषित केले आहे. त्याप्रमाणे पत्रकार परिषदेत आम्ही त्यांच्या नावाची घोषणा करीत आहोत. आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी त्या एकमेव उमेदवार असून त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.