नांदगाव समुद्रकिनारी सापडले जखमी अवस्थेतील कासव
By Admin | Updated: June 29, 2015 04:09 IST2015-06-29T04:08:50+5:302015-06-29T04:09:00+5:30
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शंकर मंदिर स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनारी जखमी अवस्थेतील कासव आढळून आले.

नांदगाव समुद्रकिनारी सापडले जखमी अवस्थेतील कासव
बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शंकर मंदिर स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनारी जखमी अवस्थेतील कासव आढळून आले.
नांदगाव समुद्रकिनारी सकाळी सातच्या सुमारास निसर्गप्रेमी संजय गाणार, उपसरपंच जितेंद्र दिवेकर, रमेश गिरणेकर व गजेंद्र शहापूरकर यांना एक जखमी अवस्थेतील कासव आढळून आले. त्या कासवाचा डावा पाय तुटलेला होता. सदर जखमी अवस्थेत सापडलेल्या कासवाबाबत मुरुड येथील वनविभागाचे वनपाल व्ही. सी. पांडे यांना तातडीने कळविण्यात आले व कासवाला एका पाण्याच्या टाकीमध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले आहे.
वनविभागाचे वनपाल परिमंडळ वनाधिकारी मंडहा यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन जखमी कासवाला औषधोपचार करण्यासाठी ताब्यात घेतले असून उपचारानंतर त्याला समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.
नुकताच रेवदंडा समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मोठ्या जहाजाची धडक बसून जखमी होऊन मृत झाला. ही घटना ताजी असतानाच रविवारी हा जखमी कासव आढळला. अशा प्रकारे मोठ्या जहाजांची धडक होऊन जलचर जखमी होत असल्यामुळे निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)