पाेलादपूर येथे लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवांचे मशिदीत नमाज पठण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 08:48 AM2021-11-05T08:48:31+5:302021-11-05T08:48:45+5:30

रायगड जिल्ह्यातील कालवली गावात ६५ वर्षांपासूनची परंपरा

Namaj Pathan by Hindus in the mosque for Lakshmi Puja at Poladpur | पाेलादपूर येथे लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवांचे मशिदीत नमाज पठण 

पाेलादपूर येथे लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवांचे मशिदीत नमाज पठण 

Next

- सिकंदर अनवारे        
लोकमत न्यूज नेटवर्क    
महाड : दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला वेगळेच महत्त्व आहे. या  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील कालवली गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याची अनोखी परंपरा आजही ग्रामस्थांनी जपून ठेवली आहे. लक्ष्मीपूजनाला गावातील हिंदू बांधवांनी गावातील जामा मशिदीत नमाज पठण केले. ही परंपरा गेली ६५ वर्षांपासून सुरू आहे.  

चिखलीतील बांदल यांचे कालवलीतील शिष्य गुरुवर्य सदूबाबू पार्टे तथा पार्टे बाबा आणि नानाबाबा वलिले यांच्यातील सख्यातून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. या दोघांमध्ये सख्य कसे झाले याबाबत कोणासही काहीही माहिती नाही. मात्र, नानाबाबा वलिले यांची ही परंपरा कालवली ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली आहे.  
कालवली हे महाडजवळ असलेले पोलादपूर तालुक्यातील गाव. गेली अनेक वर्षे या गावात सुख, शांती आणि धार्मिक ऐक्य कायम आहे. गावातील सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना दिसतात. या गावात गेली अनेक वर्षे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंदू बांधव मशिदीमध्ये येऊन नमाज अदा करतात. 

आजही लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवांनी आपली परंपरा कायम ठेवली. नमाज अदा केल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने जमलेल्या हिंदू बांधवांना मुस्लीम बांधवांनी दिवाळी भेट देऊन आनंद व्यक्त केला.  आगामी काळातही ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा मानस आप्पा पार्टे यांनी यावेळी व्यक्त केला. 

या परंपरेला गुरू-शिष्य परंपरा म्हणावे अथवा मैत्रीसंबंध याबाबत बुजुर्ग काही सांगू शकत नाहीत. मात्र, जो मंत्र सिद्ध करायचा असतो; तो सोनू महंमदच्या शाळेमध्ये म्हणजे मशिदीमध्ये नमाज पढूनच सिद्ध होईल, असा उल्लेख गुरुवाणीमध्ये असल्याने गेल्या सुमारे ६५ वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी या विचारांच्या तीन तालुक्यांमध्ये विखुरलेल्या हिंदू बांधवांकडून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नमाज अदा केली जाते.      - आप्पा पार्टे, ज्येष्ठ हिंदू बांधव.

Web Title: Namaj Pathan by Hindus in the mosque for Lakshmi Puja at Poladpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.