मुरुड समुद्रकिनारी रोडावली पर्यटकांची संख्या
By Admin | Updated: April 24, 2017 02:33 IST2017-04-24T02:33:10+5:302017-04-24T02:33:10+5:30
शालेय परीक्षा संपल्या असून शाळांनाही सुट्या लागल्या आहे. तरी देखील मुरुड जंजिरा येथे पर्यटकांची संख्या मात्र रोडावली आहे.

मुरुड समुद्रकिनारी रोडावली पर्यटकांची संख्या
नांदगाव/मुरुड : शालेय परीक्षा संपल्या असून शाळांनाही सुट्या लागल्या आहे. तरी देखील मुरुड जंजिरा येथे पर्यटकांची संख्या मात्र रोडावली आहे. सध्या मुरु ड तालुक्याचे तापमान ३७ ते ३८डिग्री सेल्सियसमध्ये आहे. सर्व जण घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. दरवर्षी या ठिकाणी मुलांच्या १५ एप्रिलपर्यंत परीक्षा कालावधी संपताच शेकडोच्या संख्येने पर्यटकांचे लोंढे येतात. मात्र सध्या उष्णतेत भर पडल्याने येथील पर्यटक संख्या रोडावली आहे. त्यातच भर म्हणून येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. प्रचंड उकाडा असताना वीज अचानक गायब होण्याच्या प्रकारामुळे स्थानिक त्रस्त झाले असून पर्यटकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. याचाही काही प्रमाणात पर्यटनावर परिणाम झाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहिजे तशा प्रमाणात दिसत नाही. मुरु ड तालुक्याचे तापमान एवढ्या प्रमाणात कधीच नसते, परंतु यावर्षी मात्र प्रचंड उकाड्याचा त्रास मुरु डकरांना सहन करावा लागत आहे. काशिद समुद्रकिनारी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु तिथे सुद्धा पर्यटक जास्त प्रमाणात वस्ती करताना आढळून येत नाही. सकाळी येऊन सायंकाळी समुद्रकिनारी भटकंती करून निघून जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लॉज मालकांना याचा फटका बसत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या एप्रिल महिन्यात मुरुडच्या पर्यटन व्यवसायाला फटका बसला असून मे महिना तरी तेजीत जाईल अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. पर्यटकांची संख्या रोडावल्याने समुद्रावरील घोडागाडी व्यवसाय करणारे, रेतीवरील गाड्या चालवणारे, तसेच हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांना उष्णतेमुळे मंदीचा फटका सहन करावा लागत
आहे.
याला अपवाद म्हणजे फणसाड अभयारण्यात पर्यटकांची संख्या जास्त पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर)