उड्डाणपूल न बांधल्यास आंदोलन
By Admin | Updated: August 27, 2015 23:11 IST2015-08-27T23:11:09+5:302015-08-27T23:11:09+5:30
येथील कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून रेल्वेच्या उड्डाणपुलावरून जावे लागते. रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणात

उड्डाणपूल न बांधल्यास आंदोलन
नागोठणे : येथील कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून रेल्वेच्या उड्डाणपुलावरून जावे लागते. रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणात असणारा जुना उड्डाणपूल रद्द करून रेल्वेकडून नवीन उड्डाणपूल बांधला जात आहे. या उड्डाणपुलाची लांबी महामार्गाच्या पश्चिम बाजूपर्यंत वाढवावी, अन्यथा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कोएसोच्या शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांनी दिला. येथील कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात कै. अ. जे.जैन प्राथमिक शाळा, गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर माध्यमिक शाळा, सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय आणि आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय असून दरवर्षी तीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. महामार्ग ओलांडून पुढे रेल्वेच्या उड्डाणपुलावरून त्यांना विद्यासंकुलात जावे लागते. १९८६ पासून उड्डाणपूल कार्यरत असून त्यावेळी फक्त एकच रेल्वे मार्गिका टाकण्यात आली होती. मात्र, आता याच उड्डाणपुलाखालून चार मार्ग नेण्याचे प्रयोजन असल्याने प्रशासनाने हा जुना उड्डाणपूल रद्द करून त्याचे शेजारीच नवीन उड्डाणपूल बांधण्यास सुरु वात केली आहे. रेल्वे नवीन उड्डाणपूल बांधत आहे, मात्र हा उड्डाणपूल महामार्गाचे पश्चिम बाजूपर्यंत वाढविल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास होणार असल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याने तातडीने येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी नरेंद्र जैन यांनी केली आहे. (वार्ताहर) पुढील अधिकार महामार्गाच्या अखत्यारीत येथील रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी ए.के.सिंग म्हणाले की, हा नवीन उड्डाणपूल महिन्याभरात पूर्ण होवून नागरिकांसाठी खुला केला जाईल. रेल्वेच्याच जागेत पूल उभारण्याचा आम्हाला अधिकार असून पुलाची लांबी महामार्गाच्या पलीकडपर्यंत वाढवायची असेल, तर ती संपूर्ण जबाबदारी महामार्ग खाते किंवा संबंधित ठेकेदाराची आहे, आमच्याकडून त्यांना सूचित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.