तळ्यात बुडणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईसह मुलाचा बूडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2024 21:03 IST2024-06-11T21:03:31+5:302024-06-11T21:03:56+5:30
तळ्यात कपडे धुण्यासाठी गेलेले मायलेक संध्याकाळी साडे सात वाजले तरी घरी परत आले नाहीत.

तळ्यात बुडणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईसह मुलाचा बूडून मृत्यू
मधुकर ठाकूर
उरण : तळ्यात बुडणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुदैवी आई आणि मुलाचा बूडून मृत्यू झाल्याची घटना उरण तालुक्यातील पिरकोन गावात घडली.
उरण तालुक्यातील पिरकोन गावात निरा पाटील (२५) व त्यांचा मुलगा रिहान पाटील (७) गावातील तळ्यात संध्याकाळी कपडे धुवण्यासाठी तळ्यात गेले होते. आई कपडे धुण्याच्या कामात व्यस्त असताना अचानक रिहानचा पाय पायरीवरून घसरला आणि तळ्यात गंटगळ्या खाऊ लागला. रिहानला बुडताना पाहून वाचवण्यासाठी आईने थेट तळ्यात उडी घेतली. मात्र मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही दुदैवाने बुडून मृत्यू झाला.
तळ्यात कपडे धुण्यासाठी गेलेले मायलेक संध्याकाळी साडे सात वाजले तरी घरी परत आले नाहीत. यामुळे काळजीत पडलेल्या नीरा यांचे सासरे तळ्याकाठी पाहण्यासाठी आले.त्यांना तळ्याकाठी धुवण्यासाठी आणलेले कपडे व चपला दिसल्या.मात्र सुन निरा व नातू रिहान काही दिसले नाहीत.त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला.त्यानंतर तळ्यात तर बुडाले नसतील ना? अशी शंका त्यांच्या मनात आली व त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आरडा- ओरडा ऐकून ग्रामस्थ तळ्याकाठी आले. त्यांनी तळ्यात शोध घेतला असता आई-मुलगा बुडालेल्या अवस्थेतही एकमेकांच्या हातात घालून मृत्युमुखी पडल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.
दोघांचाही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली. मात्र माय-लेकराचा अशा रीतीने दुदैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.