मोरझोत धबधबा पर्यटकांचे आकर्षण
By Admin | Updated: July 27, 2015 23:34 IST2015-07-27T23:34:43+5:302015-07-27T23:34:43+5:30
पावसाळा सुरु झाला की, मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्व शहरवासीयांचे सुटीमधील फिरण्याचे ठिकाण म्हणजे कोकण. येथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली असून येथील सौंदर्य

मोरझोत धबधबा पर्यटकांचे आकर्षण
पोलादपूर : पावसाळा सुरु झाला की, मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्व शहरवासीयांचे सुटीमधील फिरण्याचे ठिकाण म्हणजे कोकण. येथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली असून येथील सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. कोकणच्या डोंगर दऱ्या पावसाळ्यात काश्मीर खोऱ्याची आठवण करुन देतात. हे निसर्ग सांैदर्य अनुभवण्यासाठी, चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची धबधब्याच्या ठिकाणी गर्दी होत आहे.
पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यात असंख्य धबधबे निर्माण होतात. मात्र आकर्षणाचा मानबिंदू ठरतो तो उमरठ जवळील मोरझोत धबधबा. उमरठ जवळील चांदके व खोपड गावच्या मध्यभागी हा धबधबा जवळजवळ २०० ते २५० फुटावरुन कोसळतो. या कड्या कपाऱ्यात निर्माण झालेली नैसर्गिक गुहा व आजूबाजूचा हिरवागार परिसर एका वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातो. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामांच्या समाधीला नतमस्तक होऊन येथे येणारा प्रत्येक पर्यटक नंतरच मोरझोतकडे जातो. वरुन एकसंध येणारा मोरझोतचा हा जलप्रवाह जमिनीवर पडताच मोर आपला पिसारा फुलवून थुई - थुई नाचत असल्याचा भास निर्माण करतो.
या धबधब्यावर महाड - पोलादपूर तालुक्यासह मुंबई - पुणे येथील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. जसाजसा पावसाचा जोर वाढतो तसातसा हा धबधबा आपला आकार वाढवतो. कधी कोवळ्या उन्हात येथे इंद्रधनुष्याचे सप्तरंग पर्यटकांना दर्शन देऊन जाते.
या धबधब्यापर्यंत गाडी जात असल्याने पर्यटक जास्त संख्येने येथे येत असतात. मोरझोत धबधब्याजवळ मोठे दगड तसेच तीव्र उतार असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. या धबधब्याजवळच असणारी गुहा पाच - पन्नास माणसे सहज बसू शकतील एवढी मोठी आहे. हे पर्यटनस्थळ विकसित करणे आवश्यक असून येथे फूटपाथ होणे गरजेचे आहे.
ही भूमी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असल्याने पर्यटकांनी येथे कोणत्याही प्रकारची छेडछाड न करता मद्यपान टाळावे, अशी सर्व नरवीरप्रेमींची इच्छा आहे. (वार्ताहर)
उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामांच्या समाधीला नतमस्तक होऊन येथे येणारा प्रत्येक पर्यटक नंतरच मोरझोतकडे जातो. उमरठजवळील चांदके व खोपड गावच्या मध्यभागी हा धबधबा सुमारे २०० ते २५० फुटावरुन कोसळतो.
मोरझोत धबधब्यापर्यंत गाडी जात असल्याने पर्यटक जास्त संख्येने येथे येत असतात. या धबधब्याजवळ मोठे दगड तसेच तीव्र उतार असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. येथील गुहेत पाच - पन्नास माणसे सहज बसू शकतील एवढी मोठी आहे.