मोरा मासळी मार्केटची दुरवस्था
By Admin | Updated: October 28, 2015 00:57 IST2015-10-28T00:57:20+5:302015-10-28T00:57:20+5:30
उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाड्यात असणाऱ्या मासळी मार्केटची दुरवस्था झाली आहे. हे मार्केट मोडकळीस आले असून, कधीही कोसळण्याची भीती आहे

मोरा मासळी मार्केटची दुरवस्था
चिरनेर : उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाड्यात असणाऱ्या मासळी मार्केटची दुरवस्था झाली आहे. हे मार्केट मोडकळीस आले असून, कधीही कोसळण्याची भीती आहे. कोळीवाड्यातील मच्छीमार महिला आपला जीव धोक्यात घालून या मार्केटमध्ये मच्छी विकतात.
मार्केटमध्ये सार्वजनिक शौचालय असून, या शौचालयांचे दरवाजे निखळले आहेत. या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मासळी घेण्यास ग्राहक नापसंती दर्शवतात. याचा परिणाम मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत आहे. नगर परिषदेने हे मार्केट लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास भविष्यात हे मार्केट कोसळण्याचा धोका आहे.
मोरा कोळीवाडा हा उरण तालुक्यातील दुसरा मोठा कोळीवाडा आहे. हा कोळीवाडा उरण नगर परिषदेच्या अखत्यारीत असून, पालिकेच्या माध्यमातून येथे सोयी-सुविधा पुरविल्या जातात. मात्र सध्या मार्केटची दुरवस्था झाली आहे. मासेविक्रीसाठी बांधण्यात आलेले काँक्र ीटचे ओटे फुटून खड्डे पडले आहेत. छपरावरील लोखंडी पाइपना गंज लागला असून, हे पाइप तुटले असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)