आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; लाच लुचपत कार्यालयात एक तास चौकशी
By राजेश भोस्तेकर | Updated: January 10, 2024 15:12 IST2024-01-10T15:10:49+5:302024-01-10T15:12:56+5:30
यापुढे चौकशीला हजर राहणार नाही - आमदार राजन साळवी

आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; लाच लुचपत कार्यालयात एक तास चौकशी
अलिबाग : रायगड लाच लुचपत विभागातर्फे गेली दीड वर्षापासून माझी आणि कुटुंबाची चौकशी सुरु आहे. हवी असलेली सर्व माहिती मी दिली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही चौकशीला मी हजर राहणार नाही. जी काय कारवाई आपल्याला करायची आहे ती करा असे लाच लुचपत अधिकारी याना सांगितले असून माझा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास असल्याचे आमदार राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी लाच लुचपत कार्यालयात एक तास चौकशी केल्यानंतर साळवी कुटुंब बाहेर आले.
कोकणातले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या भाऊ, वहिनी आणि पुतण्या याना बुधवारी २७ डिसेंबर रोजी रायगड लाच लुचपत विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. लाच लुचपत कार्यालयात हजर राहण्यासाठी साळवी कुटुंबीयांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार बुधवार १० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी, भाऊ दीपक साळवी, पुतण्या दुर्गेश दीपक साळवी हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात चौकशीला हजर झाले आहेत. वहिनी अनुराधा दीपक साळवी या आजारपणामुळे गैरहजर राहिल्या होत्या. एक तास चौकशी केल्यानंतर साळवी कुटुंब हे कार्यालयाबाहेर आले.
आमदार राजन साळवी यांची मालमत्ते बाबत स्वतः ची आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी अलिबाग लाच लुचपत कार्यालयात सुरू आहे. बुधवारी १० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी, भाऊ भाऊ दीपक साळवी, पुतण्या दुर्गेश दीपक साळवी हे चौकशीला हजर झाले होते. यावेळी साळवी कुटुंबाच्या वाहने बाबत तसेच इतर कागदपत्रे यांची माहिती विभागाने घेतली. त्यानंतर एक तासाने चौकशी पूर्ण होऊन बाहेर पडले.
दीड वर्षापासून चौकशी सुरू असून सर्व माहिती दिली आहे. यापुढे कोणत्याही चौकशीला हजर राहणार नाही. असे सांगितले आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. असे आमदार राजन साळवी यांनी चौकशीनंतर बाहेर आल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.