नागोठणेत वृक्षदिंडीद्वारे संदेश
By Admin | Updated: June 25, 2016 01:57 IST2016-06-25T01:57:44+5:302016-06-25T01:57:44+5:30
वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून त्याचा संदेश पोहोचविण्यासाठी वन विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून वृक्षदिंडीचा कार्यक्रम घेण्यात आला

नागोठणेत वृक्षदिंडीद्वारे संदेश
नागोठणे : वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून त्याचा संदेश पोहोचविण्यासाठी वन विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून वृक्षदिंडीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १ जुलै ला होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या
कार्यक्र मात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन नागोठणे वन परिक्षेत्राधिकारी बी. व्ही. पाटील यांनी केले.
नागोठणे वन कार्यालय आणि कोएसोचे गु.रा.अग्रवाल विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी झालेल्या सांगता समारंभात पाटील बोलत होते. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता अग्रवाल विद्यामंदिराच्या पटांगणात शाळेचे मुख्याध्यापक एस.पी. कांबळे आणि वनाधिकारी बी. व्ही. पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून या वृक्षदिंडीने शहराकडे प्रस्थान केले. महामार्गावरून गांधी चौक, प्रभुआळी, खुमाचा नाका, बाजारपेठ, शिवाजी चौक, पोलीस ठाणे मार्गे ही वृक्षदिंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेण्यात आली. यावेळी सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, सदस्य प्रकाश मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दिंडीचे स्वागत करून पूजन केले. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असून, वृक्षांची कत्तल झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. यासाठी वृक्षसंवर्धन करणे महत्त्वाचे असल्याचे प्रकाश मोरे यांनी सांगितले.