म्हसळा येथे सर्वाधिक पाऊस
By Admin | Updated: June 25, 2016 01:54 IST2016-06-25T01:54:48+5:302016-06-25T01:54:48+5:30
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी

म्हसळा येथे सर्वाधिक पाऊस
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी पावसाने बरसून गेल्या १५ दिवसांचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या दमदार आगमनाने मात्र शेतीच्या कामांना सुरुवात झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाला सातत्याने बगल देत मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होईल, असे वाटत होते मात्र त्याने हुलकावणी दिल्याने मान्सूनचे आगमन तब्बल २० दिवस लांबले. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्या करपण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला होता. त्याचप्रमाणे वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्याने नागरिकही प्रचंड हैराण झाले होते.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही मोठ्या संख्येने सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता आता त्यानिमित्ताने दूर झाल्याचे दिसून येते. गेल्या २४ तासात सरासरी ६२.७१ मिमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे नद्या, नाले छोटी-मोठी धरणे, विहिरींमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईच्या ठिकाणी काही अंशी समाधानाची स्थिती निर्माण होण्यास मदत मिळत असल्याचे चित्र आहे. पावसाच्या कालावधीत एमएसईडीमार्फत होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये सातत्याने अडथळे येत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. (प्रतिनिधी)अलिबाग: शुक्र वारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण १००३.४६मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ६२.७१ मिमी आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकूण पाऊस १८६५.४० मिमी होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ११६.५९ मिमी होते. यंदाचा पाऊस गतवर्षीच्या सरासरी प्रमाणास अद्याप पोहोचू शकलेला नाही.गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी, मुरुड ८७ मिमी, रोहे ८५ मिमी, माणगाव ७३ मिमी, महाड ७२ मिमी, पोलादपूर ५५ मिमी, उरण ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रोह्यात पावसाचे पुनरागमन
रोहा : वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर रोहा तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले होते. परंतु त्या नंतर तीन दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग काहीसा चिंतेत आला होता. परंतु संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर पावसाने तालुक्यात पुनरागमन केल्याने बळीराजा सुखावला असून शेतकऱ्यांनी चिखलणी,तसेच राबांना खत मारणे ही कामे सुरू केली आहेत. मत्स्यप्रेमी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. जोरदार पाऊस झाल्यास वळगणीचे मासे खाण्यास मिळतील अशी मासेप्रेमींची अपेक्षा आहे.