माथेरानमध्ये हातरिक्षांचे मजूर दाखल

By Admin | Updated: April 25, 2017 01:19 IST2017-04-25T01:19:13+5:302017-04-25T01:19:13+5:30

केवळ आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी अनेक भागांतून, जिल्ह्यातून इथे मोलमजुरी करण्यासाठी मजूर वर्ग येत असतो.

Matheran's laborers were admitted | माथेरानमध्ये हातरिक्षांचे मजूर दाखल

माथेरानमध्ये हातरिक्षांचे मजूर दाखल

मुकुंद रांजणे / माथेरान
केवळ आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी अनेक भागांतून, जिल्ह्यातून इथे मोलमजुरी करण्यासाठी मजूर वर्ग येत असतो. येथे भले कंपन्या, कारखाने नाहीत, परंतु अतिकष्टदायक कामे करून वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेऊन आपल्या कुटुंबासाठी रिक्षा ओढण्यासाठी झटणारे कष्टकरी मजूर येथे पहावयास मिळतात. अनेकजण हे हातरिक्षा तसेच सामानाची हातगाडी ओढणे हीच कामे करताना दिसत आहेत. मुळातच हा सर्वच मजूर वर्ग यवतमाळ, नांदेड व अन्य भागांतून नियमितपणे येतो. नुकताच वर्षातील अखेरचा पर्यटनाचा सुट्यांचा हंगाम मे महिना असल्याने हे मजूर येथे दाखल झाले आहेत. माथेरानमध्ये एकूण ९४ हातरिक्षा असून प्रत्येक हातरिक्षा ओढण्यासाठी तीन मजुरांची आवश्यकता असते.
प्रत्येक भाड्यामागे एक चतुर्थांश हिस्सा हातरिक्षा मालकाला द्यावा लागतो तर उर्वरित तीन हिस्से हे मजूर समान विभागून घेतात. घोड्यापेक्षा हातरिक्षांच्या दरात फक्त काहीअंशी फरक आहे, तर घोडेवाले सुद्धा या गाडीच्या भाड्याएवढे पैसे पर्यटकांकडून घेताना दिसतात. मेहनत जरी या गाडीवाल्यांची अधिक असली तरीसुद्धा प्रवाशांचे भाडे मिळविण्यासाठी या गाडीवाल्यांना दस्तुरी नाक्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. या गाडीत एका पर्यटकासोबत एक बॅग आणि लहान मूल बसविले जाते, परंतु या हातरिक्षात सामान घ्यायचे नाही फक्त पॅसेंजरलाच बसवावे अशीच दादागिरी सुद्धा दस्तुरी नाक्यावर नेहमीच पहावयास मिळते. त्यामुळे या प्रवासाचा नाहक भुर्दंड सामान वाहून नेण्यासाठी अन्य हमाल करून प्रवाशांना सोसावा लागत आहे. दस्तुरी नाक्यावर शासनाने ठरविलेले दरपत्रक नाहीत.त्यामुळे अव्वाच्यासव्वा रक्कम उकळली जात आहे. जेवढी रक्कम मुंबईपासून नेरळपर्यंत येण्यास खर्च होत नाही तेवढी रक्कम केवळ दस्तुरी ते गावात येण्यासाठी (तीन कि.मी.साठी ) खर्च होत आहे.
काही घोडेवाले अधिक दर आकारताना दिसतात.जवळपासचे दोन ते चार पॉइंट दाखवून पुन्हा दस्तुरीला सोडण्यासाठी काही जण पंधराशे ते दोन हजार रुपये घेत आहेत. तसेच गावातून दस्तुरीला जावयाचे असल्यास प्रवाशांना अमनलॉज या रेल्वे स्टेशनला उतरविण्यात येते. भाड्याचे सगळे पैसे घेऊन प्रवाशांना पुढील पायपीट करण्यास भाग पाडले जात आहे.

Web Title: Matheran's laborers were admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.