तब्बल 157 शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:11 IST2021-04-09T01:11:21+5:302021-04-09T01:11:28+5:30
पोषण आहार शिजवण्यासाठी शाळांना मिळणार गॅस

तब्बल 157 शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : जिल्हा परिषद, महापालिका शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी शासनाच्या वतीने गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत. दोन सिलिंडर, एक शेगडी, रेग्युलेटर, गॅसनळी यासाठीचे अनुदान शाळांना मिळणार आहे. त्यामुळे आता पनवेल तालुक्यातील १५७ शाळांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळणार आहे.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांची गळती थांबवण्याकरिता राज्यात १९९५ साली इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबवली गेली. या योजनेचा पुढे विस्तार करत सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांना ही योजना लागू केली. यासाठी शासन पोषण आहाराचे अनुदान विद्यार्थीनिहाय देत असते. त्यातून भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य व इंधन आदीचा खर्च केला जातो. पनवेल तालुक्यातील ३१९ शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवला जातो. यापैकी १६२ शाळांनी स्वत:च्या खर्चातून गॅस कनेक्शन घेतले आहे. अजूनही १५७ शाळांमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठी चुलीचा वापर केला जात आहे. या शाळांची माहिती पाठविण्यात आली असून, शासनाच्या अनुदानातून या शाळांना कनेक्शन मिळणार आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील १५७ शाळांना धुरापासून मुक्ती मिळणार आहे.
सेंट्रल किचन प्रणाली अंतर्गत योजना
ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये चुलीवर अन्न शिजवले जात आहे. यातून संबंधितांना आजाराचा धोका संभवतो. त्याचबरोबर अवतीभवती लहान मुलांचा वावर असतो. त्यांना त्रास होतो. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र शासनाने सेंट्रल किचन प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल तालुक्यातील १५७ शाळांना गॅस कनेक्शन नव्हते. तशी माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आता निधी मिळणार असल्याने या शाळांचा गॅस कनेक्शनचा प्रश्न सुटणार आहे. अगोदर जो खर्च इंधनावर करण्यात येत होता, तो आता गॅसवर करण्यात येणार आहे. शाळांना गॅसजोडणी देऊन पर्यावरण संरक्षणाचे काम होणार आहे.
- महेश खामकर, गटशिक्षणाधिकारी, पनवेल