आंबा, काजू बागायतदारांना मिळणार विमा संरक्षण
By Admin | Updated: October 16, 2014 22:51 IST2014-10-16T21:58:29+5:302014-10-16T22:51:35+5:30
आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली

आंबा, काजू बागायतदारांना मिळणार विमा संरक्षण
ओरोस : प्रायोगिक तत्त्वावरील हवामानावर आधारीत पथदर्शक फळपीक विमा योजना २०१५ साठी आंबा बागायतदारांना १ लाख विमा संरक्षण तर काजू बागायतदारांना ७५ हजार विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विमा हप्ता भरण्याची मुदत आंबा बागायतदारांसाठी ३१ डिसेंबर २०१५ तर काजू बागायतदारांसाठी ३० नोव्हेंबर २०१५ असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए. एल. नातू यांनी दिली.
आंबा व काजू बागायतदारांसाठी शासनाने १० सप्टेंबर २०१४ पासून फळपीक विमा योजना सुरू केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असून बिगर कर्जदारांना ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. आंबा बागायतदारांसाठी प्रति हेक्टरी वर्षाला ६ हजार रुपये तर काजू बागायतदारांना वर्षाला ४ हजार ५०० रूपये विमा हप्ता आहे.
१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत १०.५ अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान असेल तर अशा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत ११ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान असेल तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ मार्च ते ३१ मे २०१५ या कालावधीत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. विमा हप्ता भरण्यासंदर्भात कृषी विभागाचे मंडळ अधिकारी, तालुका अधिकारी, उपविभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र वाकडे यांनी केले
आहे. (वार्ताहर)
आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली
१ जानेवारी ते १५ मे २००५ या कालावधीत अवेळी पाऊस पडला तर आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ही नुकसानभरपाई एका दिवसात जर ५ मि.मी. पाऊस पडला तर ८ हजार, २ दिवस पाऊस पडला तर १२ हजार व ३ दिवस पडला तर २० हजार अशी मिळणार आहे. जर एक दिवस ५ मि.मी. पाऊस पडला तर काजू बागायतदारांना १० हजार, दोन दिवस पडला तर २० हजार, तीन दिवस पाऊस पडला तर ३५ हजार व चार दिवस पाऊस पडला तर ५० हजार रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई हेक्टरी मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत पाऊस पडला तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळेल.