माणगाव काळ नदीचे पाणी दूषित
By Admin | Updated: April 28, 2017 00:20 IST2017-04-28T00:19:05+5:302017-04-28T00:20:49+5:30
माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे.

माणगाव काळ नदीचे पाणी दूषित
माणगाव : माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे माणगांव नगरपंचायत जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी माणगावमधील ग्रामस्थांनी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन गुरु वारी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पवार व सहकाऱ्यांनी दिले आहे.
माणगावमधील अनेक निवासी संकुल गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट काळ नदीत सोडले आहे. या काळ नदीचे पाणी शहरातील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांतील नागरिकांना काळ नदीतील पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यपरिस्थितीत हे पाणी अत्यंत दूषित झाले असून साथीचे अनेक रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सन २०१० मध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने माणगाव काळ नदीतील दूषित पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा दाखला दिला होता. याकडे नगरपंचायत डोळेझाक करीत आहेत. या समस्येची रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार, भाजपाचे बाळशेठ घोणे, सुरेंद्र साळी, खांदाड पोलीस पाटील नथुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते अकबर परदेशी आदींसह समिती प्रशासन अधिकारी, माणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी पाहणी करून नगरपंचायत प्रशासनावर व बिल्डर्स मालकांवर तीव्र संताप व्यक्त केला.
या गहन समस्येबाबत माणगावकर ग्रामस्थांनी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत माहितीकरिता माणगाव प्रांताधिकारी, माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व नगरपंचायत माणगाव यांना देण्यात आली आहे. (वार्ताहर)