Mangaon blast case: Two directors charged with owning a cryptozo company | माणगाव स्फोट प्रकरण : क्रिप्टझो कंपनीच्या मालकासह दोन संचालकांवर गुन्हा दाखल
माणगाव स्फोट प्रकरण : क्रिप्टझो कंपनीच्या मालकासह दोन संचालकांवर गुन्हा दाखल

माणगाव : तालुक्यातील विळेभागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक व तीन संचालकांपैकी दोघांवर माणगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यातील एक संचालक रवी शर्मा अद्याप मोकाट आहे.

क्रिप्टझो कंपनीचे मालक सुरेश शर्मा यांनी कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी केल्याचे तपासात उघड झाले आहे. कंपनीमधील रॉ मटेरियल रूममध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. तसेच जी जागा कच्चा माल साठविण्यासाठी मंजूर करण्यात आली होती, त्या ठिकाणी आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

कंपनीतील संचालक अशोक कोटियन व सचिन दारणे यांनी कंपनीच्या रॉ मटेरियल रूममध्ये आग विझविण्याचे प्रात्यक्षिक घेताना कामगारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केला.

रॉ मटेरियल रूममध्ये लावलेल्या आगीवर रॉ मटेरियल रूमच्या छतास असलेल्या नोझलमधून गॅस सोडल्यानंतर आग जास्त भडकली व रूममध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होऊन लाकडी दरवाजा तोडून आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या. यात रूमच्या बाहेर उभे असलेले १८ कामगार त्या आगीमुळे भाजून गंभीर जखमी झाले. त्यातील राकेश राम हळदे व आशिष एकनाथ येरुणकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतांच्या नातेवाइकांना तीस लाखांची मदत!
अधिकारी व कंपनीमालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत व भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी शनिवारी घेतली. या वेळी पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केली. मालकांनी मृतास पाच लाखांचे धनादेश दिले, तर जखमीस पाच लाख व त्याचा वैद्यकीय खर्च तसेच कामावर येईपर्यंत पगार देण्याचे कबूल केल्यावर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मृतांच्या नातेवाइकांना पुढील तीन महिन्यांत प्रत्येक महिन्यास दहा लाख असे तीस लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले.

सुरेश शर्मा हे कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी कंपनीत सुरक्षेची काळजी न घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय इतर संचालकांमध्ये अशोक कोटियन, सचिन धरणे, रवि शर्मा यांचा समावेश आहे. पैकी रवि शर्मा बाहेर होते, तर प्रात्यक्षिक वेळी अशोक कोटियन व सचिन धरणे उपस्थित होते. म्हणून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवि शर्मा उपस्थित नसल्याने त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.
- रामदार इंगवले, पोलीस निरीक्षक, माणगाव

रवि शर्मा व रमेश शर्मा कंपनीचे मालक असून, अशोक कोटियन व सचिन धरणे हे कर्मचारी संचालक (एम्प्लॉइज डायरेक्टर) आहेत. आम्ही यांच्यावर फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार करवाई करणार आहोत.
- अंकुश खराडे, कंपनी निरीक्षक, रायगड औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग उपसंचालक मंडळ

Web Title: Mangaon blast case: Two directors charged with owning a cryptozo company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.