महिला सशक्तीकरणीसाठी महाराष्ट्र भ्रमण; प्रणाली चिकटेने केली सायकलवरून भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:50 IST2021-04-26T23:50:01+5:302021-04-26T23:50:11+5:30
प्रणाली चिकटेने केली सायकलवरून भ्रमंती : ६ महिन्यांत तब्बल ७,९२५ किमीचा प्रवास

महिला सशक्तीकरणीसाठी महाराष्ट्र भ्रमण; प्रणाली चिकटेने केली सायकलवरून भ्रमंती
पाली: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातील प्रणाली विठ्ठल चिकटे ही तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे. शनिवारी सायंकाळी ती ७९२५ किमीचा प्रवास करत सुधागडातील उद्धर येथील पर्यावरणवादी अभ्यासक तुषार केळकर यांच्याकडे आली.
अवघ्या २१ वर्षीय प्रणालीने समाज कार्यातील पदवी मिळविली असून तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील शेती करत असून तिला दोन बहिणी देखील आहेत. प्रणाली उद्धर येथे इको फ्रेंडली घरे कशी बनवावी याबाबतचे प्रशिक्षण तुषार केळकर यांच्याकडून घेणार असून तेथून रत्नागिरी आणि इतरत्र जाणार आहे. सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतुचक्र बदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या या जाणिवेतून आणि कोरोना महामारीकडून प्रत्यक्ष पर्यावरण ऱ्हासाची शिकवण या गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरून महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा निश्चय केला.
ती प्रवासात नेमके काय करते? प्रणाली आदिवासी, ग्रामीण, शहरी भागातील लोकांना व तरुणांना भेटते. त्यांच्याशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा, आणि सरकारी यंत्रणामध्ये भेटी देऊन जनजागृती करणे व माहिती पोचविणे, शक्य तितके लोकांशी त्या त्या भागातील समस्याबाबत चर्चा करणे, आरोग्याबाबत जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते.
प्रवास जिकिरीचा, पण सुखद अनुभवांचा
प्रणालीचा सायकल प्रवास हा व्यक्तिगत असून, कुठल्या शासकीय किंवा संस्थेमार्फत ती निघाली नाही. हा प्रवास स्व जबाबदारीचा असल्याचे प्रणाली सांगते. मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे घरून निघतांना पैसे वगैरे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करायचा म्हणून, लोकांकडे जे मिळेल ते खाते, त्यांच्याकडे राहते. बरेच लोक मदतसुद्धा करतात. या सहा महिन्यात अनेक सुखद अनुभव आले आहेत. उपक्रमाचे कौतुक प्रतिसाद व सहकार्य खूप चांगले मिळत आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सध्या प्रवास थांबत सुरू आहे. कोविडमुळे आवश्यकतेनुसार काळजी घेत आहे.