उनपमध्ये महाआघाडीला धक्का

By Admin | Updated: November 13, 2016 04:53 IST2016-11-13T01:29:09+5:302016-11-13T04:53:01+5:30

उरण शहर परिवर्तन महाआघाडीतील प्रभाग ‘२ ब’चे राष्ट्रवादीचे उमेदवार उनपचे माजी उपनगराध्यक्ष आणि माजी विरोधीपक्षनेते चिंतामण घरत यांनी तडकाफडकी उमेदवारी

Mahagadhila push in the city | उनपमध्ये महाआघाडीला धक्का

उनपमध्ये महाआघाडीला धक्का

उरण : उरण शहर परिवर्तन महाआघाडीतील प्रभाग ‘२ ब’चे राष्ट्रवादीचे उमेदवार उनपचे माजी उपनगराध्यक्ष आणि माजी विरोधीपक्षनेते चिंतामण घरत यांनी तडकाफडकी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या निवडणुकीतील अचानकपणे घेतलेल्या माघारीमुळे निवडणुकीआधीच महाआघाडीला धक्का बसला आहे. आरोग्याच्या तक्रारीमुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे चिंतामण घरत सांगत असले तरीही विविध राजकीय गोटात अनेक तर्क व्यक्त होऊ लागले आहेत.
उरण शहर परिवर्तन महाआघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसे असे राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. एकत्रित येऊन मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सेना-भाजपाचा पराभव करण्यासाठीच माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची निर्मिती करण्यात आली आहे.
उनपच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने चर्चेअंती पक्षनिहाय जागांचे वाटपही केले आहे. जागावाटपात चिंतामण घरत यांना महाआघाडीने प्रभाग २चे अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. पाच वेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्या चिंतामण घरत यांनी निवडून आल्यानंतर शहराच्या विकासासाठी कोणकोणती कामे करणार याचा लेखाजोखाही जाहीरपणे वृत्तपत्रांतून जाहीर केला होता. अशी सर्व अंगानी तयारी असताना चिंतामण घरत यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीच्या एक दिवस अगोदरच तडकाफडकी मागे घेतल्याने महाआघाडीबरोबरच विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली असल्याची माहिती चिंतामण घरत यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिली. तर कौटुंबिक समस्येमुळे घरत यांनी माघार घेतली असल्याची प्रतिक्रिया महाआघाडीचे मार्गदर्शक माजी आमदार विवेक पाटील यांनी दिली.मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांकडून महाआघाडीतील काही नेत्यांकडूनच चिंतामण घरत यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानेच संतप्त झालेल्या घरत यांनी तडकाफडकी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. तर राजकीय गोटात वेगळीच कारणे चर्चेत आहेत. चिंतामण घरत यांच्या माघारीमुळे विरोधकांना चांगलाच फायदा होणार आहे. कारण आता प्रभाग ‘२ ब’मध्ये दोनच उमदेवार उरल्याने सेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये सरळ लढाई होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Mahagadhila push in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.