तापाच्या साथीने महाडकर हैराण
By Admin | Updated: July 30, 2015 00:15 IST2015-07-30T00:15:44+5:302015-07-30T00:15:44+5:30
सध्या महाड शहराच्या विविध भागात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. थंडीताप, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, अंगदुखी, अशक्तपणा

तापाच्या साथीने महाडकर हैराण
महाड : सध्या महाड शहराच्या विविध भागात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. थंडीताप, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, अंगदुखी, अशक्तपणा आदी आजारांनी शहरातील सरेकर आळी, कांजळपरा, गवळ आळी, बाजारपेठ आदी परिसरात अनेक रुग्ण त्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय ग्रामीण रुग्णालये, तसेच खाजगी दवाखान्यात उपचार केले जात आहेत. मात्र अशा रुग्णांनी डेंग्यूच्या भीतीने घाबरून न जाता ग्रामीण रुग्णालयात तपासणी करावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
गेल्या पंधरा वीस दिवसांपूर्वी अशा रुग्णांची संख्या लक्षणीय होती. मात्र सध्या अशी डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या तुलनेत कमी होत असल्याचेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांपैकी सहा रुग्णांच्या रक्ततपासणीत त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आल्याचेही डॉ. जगताप यांनी सांगितले. या सर्व रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालय पथकासह खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडूनही शहरात डेंग्यूबाबत जनजागृती व मार्गदर्शन केले जात असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले. शहरातील सर्व भागात स्वच्छता राबवली जात असून उघडी गटारे, नाले तसेच वस्त्यांच्या परिसरात सर्वत्र जंतूनाशक फवारणी नियमितपणे केली जात असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले. (वार्ताहर)