दिवाळीसाठी विशेष मुलांनी बनवल्या पणत्या
By Admin | Updated: October 26, 2016 05:24 IST2016-10-26T05:24:37+5:302016-10-26T05:24:37+5:30
निर्मात्याने आपल्या वाट्याला दिलेल्या जीवनास दोष न देता व्यावसायिक प्रशिक्षण घेवून, व्यक्तिगत जिद्दीतून अथक मेहनतीने आपल्या चिमुकल्या हातातून

दिवाळीसाठी विशेष मुलांनी बनवल्या पणत्या
- जयंत धुळप, अलिबाग
निर्मात्याने आपल्या वाट्याला दिलेल्या जीवनास दोष न देता व्यावसायिक प्रशिक्षण घेवून, व्यक्तिगत जिद्दीतून अथक मेहनतीने आपल्या चिमुकल्या हातातून साकारलेल्या सहा हजार सौंदर्यपूर्ण पणत्यांमध्ये यंदाच्या दीपावलीत दीपज्योती उजळणार आहेत. या सुखद भावनेनेच या सहा हजार पणत्यांचे निर्माते पेण येथील आई डे केअर संस्थेतील विशेष मुले सध्या भारावून गेली आहेत.
आई डे केअर संस्थेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी व्यावसायिक मार्गदर्शन घेऊ न संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात छोटे व मोठे गणेश वाहक उंदरांच्या सुबक मूर्ती बनविल्यानंतर आता दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पणत्या बनविण्याचे काम, या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊ न स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. आपल्या संस्थेच्या नवीन इमारतीच्या उभारणीत या माध्यमातून आर्थिक हातभार लावण्याची एक मानसिकता देखील या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. यावर्षी अवघ्या १५ ते २० दिवसांच्या अल्प कालावधीत या मुलांनी तब्बल सहा हजार पणत्या तयार केल्या. या पणत्या पेण बाजारात लक्ष्मी नारायण मंदिर, आलिशान सुपर मार्केट, अॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता अशा व्यावसायिक प्रशिक्षणातून संस्थेतील ११ मुले मानधन घेवून स्वत:च्या पायावर उभे राहिले असल्याची माहिती आई डे केअर संस्थेच्या कार्याध्यक्षा स्वाती मोहिते यांनी दिली.
विशेष मुले आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणाने दुसऱ्यावर अवलंबून असतात. या मुलांना विशेष शिक्षण देणे, त्यांना योग्य थेरेपी देणे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे, आई-वडिलांच्या पश्चात किंवा हयातीत त्यांची उत्तम प्रकारे देखभाल करणे, ही काळाची गरज ओळखून या संस्थेने या मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र १५ जून २०१६ रोजी पेण येथे सुरू केले असून, सद्यस्थितीत येथे ४२ विद्यार्थी व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
विशेष मुलांमध्ये अनेक प्रकारचे कलागुण दडलेले असतात. त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता या कलेला वाव देण्याचे काम आई डे केअर संस्थेच्या माध्यमातून कार्याध्यक्षा स्वाती मोहिते व त्यांचे सहकारी १३ शिक्षक व कर्मचारी हे करीत असून, या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
१५ ते २० दिवसांच्या अल्प कालावधीत या मुलांनी तब्बल सहा हजार पणत्या तयार केल्या. या पणत्या पेण बाजारात लक्ष्मी नारायण मंदिर, आलिशान सुपर मार्केट, अॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे.