रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालयाला कुलूप
By Admin | Updated: April 25, 2017 01:13 IST2017-04-25T01:13:00+5:302017-04-25T01:13:00+5:30
कर्जत हे मुंबई-पुणे दरम्यान अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. तसेच संपूर्ण कर्जत तालुकाच नव्हे तर खोपोली, पाली, चौक, पनवेल,

रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालयाला कुलूप
कर्जत : कर्जत हे मुंबई-पुणे दरम्यान अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. तसेच संपूर्ण कर्जत तालुकाच नव्हे तर खोपोली, पाली, चौक, पनवेल, नेरळ, माथेरान, बदलापूर, अंबरनाथ आदी ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी कर्जतला येत असतात. असे असताना कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्र मांक दोनवर आरक्षित प्रवाशांसाठी असलेल्या प्रतीक्षालयाला कायमच कुलूप असल्यामुळे प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. एखाद्या प्रवाशाला प्रतीक्षालयात जायचे असेल तर कर्मचारी नसल्याने फलाट क्र मांक एकवर असलेल्या स्टेशन मास्तरांकडून चावी आणून ते उघडावे आणि नंतर बंद करून पुन्हा चावी स्टेशन मास्तरांकडे नेऊन द्यायची अशा हास्यास्पद सूचना देण्यात आल्या असल्याने प्रवासी वर्गातून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. याबाबत कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता.
पंकज ओसवाल यांनी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्र मांक दोनवर असलेल्या प्रतीक्षालयाला कायमच कुलूप असण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. रेल्वे प्रशासनाने याबाबतीत ओसवाल यांना कर्मचारी कमी असल्यामुळे ते प्रतीक्षालय कायमच बंद ठेवण्यात येत असल्याचे कळविले आहे, तसेच ज्या प्रवाशांना त्या वेटिंग रूमची चावी हवी असल्यास त्या प्रवाशांनी कर्जत रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरशी संपर्क साधावा असेही कळविले आहे, परंतु याबाबतीत पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाला कर्जत रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशाला कसे कळेल की वेटिंग रूमची चावी स्टेशन मास्तरांकडे आहे, असा प्रश्न करून याबाबतचा सूचना फलक प्रतीक्षालयाच्या आजूबाजूला लिहिलेला नाही.
आरक्षित प्रवाशांना प्रतीक्षालयाची चावी घेण्याकरिता उंच दादरा चढून दोन नंबर फलाटावरून एक नंबरच्या फलाटावर असलेल्या स्टेशन मास्तरांच्या कार्यालयातून चावी घेण्याकरिता यावे लागेल, तसेच पुन्हा चावी देण्यासाठी जावे लागेल. जर एखाद्या प्रवाशाने प्रतीक्षालयाचा उपयोग झाल्यानंतर तो प्रवासी प्रतीक्षालय तसेच उघडे ठेवून गेला तर मग काय? त्याची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाला विचारले आहेत.
यावर रेल्वे प्रशासनाने ज्या प्रवाशाला प्रतीक्षालयाची चावी हवी आहे त्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्या कार्यालयात जाऊन आपले आरक्षित तिकीट दाखवावे, नंतर रेल्वेचा एक कर्मचारी त्या प्रवाशांच्या सोबत पाठवून तो प्रवासी तेथून निघून जाईपर्यंत तेथेच राहील. तो प्रवासी गेल्यानंतर त्या प्रतीक्षालयाला कुलूप लावून चावी परत स्टेशन मास्तरच्या कार्यालयात आणून देईल. तसेच वेटिंग रूमची चावी स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये उपलब्ध असल्यासंदर्भात फलाट क्र मांक एकवर या बाबतीत फलक लावण्यात आले आहे, असेही रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना कळविले आहे. यावर चावीसंदर्भातील फलक फलाट क्र मांक एकवर न लावता तो फलाट क्र मांक दोनवरील प्रतीक्षालयाच्या बाहेरच लावण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांना कळू शकेल व प्रवासी या गोष्टीचा फायदा घेऊन शकेल, अशी विनंतीही पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास केली आहे. (वार्ताहर)