पाली तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:38 AM2019-04-04T02:38:29+5:302019-04-04T02:39:04+5:30

सर्वच अधिकारी अतिरिक्त कार्यभारावर : आठ पदांपैकी सहा रिक्त

Livestock officers in Pali taluka | पाली तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

पाली तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

Next

विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुक्यात पाली, चव्हाणवाडी आणि जांभूळपाडा या ठिकाणी श्रेणी एकचे गुरांचे दवाखाने तर वाघोशी, खवली आणि नांदगाव श्रेणी दोनचे गुरांचे दवाखाने आहेत; परंतु येथील गुरांच्या दवाखान्यात पशू वैद्यकीय अधिकारी व अन्य पदे रिक्त आहेत. पाली या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुरांच्या दवाखान्यात पशू वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक ही तीनही पदे रिक्त असून, फक्त शिपाई पदावर एक कर्मचारी हजर आहे. तर तालुक्यातील सर्वच दवाखान्यांत आठ जागांपैकी फक्त दोनच जागांवर कर्मचारी आहेत. यामुळे सुधागड तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर शेतकरी आपल्या गुरांना उपचारासाठी कुठे न्यायचे या विवंचनेत सापडला आहे.

पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाली येथील श्रेणी एकच्या गुरांच्या दवाखान्यात पशू वैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी या दोन्ही पदांवर नागोठणे येथील पशू वैद्यकीय अधिकारी भोजने यांना अतिरिक्त कार्यभार असून, मंगळवार आणि शुक्रवारी ते हजर असतात, तर वाघोशी येथील पशुधन पर्यवेक्षकांना अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. चव्हाणवाडी येथील श्रेणी एकच्या दवाखान्यात पेण येथील पशू वैद्यकीय अधिकारी तर जांभूळपाडा येथे खालापूर येथील पशू वैद्यकीय अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे.

सध्या जिल्ह्णाच्या तापमानात होत असलेल्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून माणसे विविध मार्गांनी आपला बचाव करून घेऊ शकतात. मात्र, जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. गायवर्गीय गुरे आणि प्रजननक्षम असलेल्या गुरांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्णातील जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यात वाढत असलेली उन्हाची तीव्रता, यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने जनावरे उष्माघाताचे बळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंशांपर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग व हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावराचा तोल जाऊन जनावर कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावण्याची भीती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून, वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशूपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.

जनावरांचे आजार काही ऋ तूनुसार असतात, त्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात, अशा वेळी स्थानिक पातळीवर इलाज केला जातो व जनावरे दगावतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. दवाखान्यात नेले तर लसी, इंजेक्शन उपलब्ध नसतात आणि ग्रामीण भागात तातडीने हे मिळत नाहीत, त्यामुळे दुभती जनावरे मरताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो. तरी शासनाने यात लक्ष घालावे व शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे, म्हणजे कुटुंबाला हातभार लागेल.
- शरद गोळे, शेतकरी, शिळोशी
 

Web Title: Livestock officers in Pali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.