ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:11 IST2018-05-03T04:11:05+5:302018-05-03T04:11:05+5:30
कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो

ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
विजय मांडे
कर्जत : कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बिरदोले येथून शेलू रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने आजूबाजूच्या गावातील रहिवासी नदीवर टाकलेल्या सिमेंट खांबांवरून नदी पार करतात. जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी पुलाची मागणी केली आहे.
पोशिर, बिरदोले, कोदिवले, अवसरे, वरई भागातील नोकरदार लोक तसेच उद्योग व्यवसायासाठी अनेक तरुण उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणी जात असतात. त्यांना शेलू हे रेल्वेस्थानक जवळचे असल्याने ते सर्व जण उल्हासनदी पार करून रेल्वेस्टेशन गाठत असतात. पावसाळा वगळता ते सर्व लोक उल्हासनदीमधील उथळ भाग असलेल्या बिरदोले या गावाच्या पाणवठ्यावर असलेल्या भागातून बांधिवली गावाकडे नदी पार करून पोहोचतात. त्यासाठी हे ग्रामस्थ उल्हासनदीमध्ये पायी चालत जाण्यासाठी सिमेंट खांब वापरतात. साधारण पाऊण फूट ते एक फूट रुंदीचे असलेले सिमेंट खांब पावसाळा संपला की नदीजवळ आणून अंगमेहनत करून पायवाट तयार करतात. आठ महिने त्या पायवाटेने नोकरदार, कामगार वर्गाची ये-जा सुरू असते. उल्हासनदीला लागून ठेवण्यात आलेले सिमेंट खांब रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेक जण पाण्यात पडल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे उल्हासनदीवर पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे.
सध्या त्या पाणवठ्यावर जाण्यासाठी बिरदोले गावातून पायवाट रस्ता आहे, तर पलीकडे देखील बांधिवली, शेलू गावातून पायवाट रस्ता आला आहे. दुसरीकडे तेथे उल्हासनदीचे पात्रदेखील अरुंद असून शासनाचा आर्थिक भारदेखील कमी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तेथे पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भगवान जामघरे यांनी केली आहे.