उत्सवकाळामध्ये विजेचा लपंडाव सुरू
By Admin | Updated: September 19, 2015 00:10 IST2015-09-19T00:10:53+5:302015-09-19T00:10:53+5:30
गणेशोत्सव साजरा करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी महाड तालुक्यामध्ये बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र प्रत्यक्ष गणेशोत्सव

उत्सवकाळामध्ये विजेचा लपंडाव सुरू
बिरवाडी : गणेशोत्सव साजरा करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी महाड तालुक्यामध्ये बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र प्रत्यक्ष गणेशोत्सव काळामध्ये महाड शहर व तालुक्यातील बिरवाडी, खरवली परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली आहे.
गणेशाचे आगमन झाल्यानंतर तब्बल ४८ तासामध्ये आठ वेळा विद्युतपुवठा खंडित झाला होता, त्यामुळे गणेशभक्तांची प्रचंड गैरसोय होत होती. महाड शहरामधील तसेच तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी व गणेशदर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने बाजरपेठेत गर्दी केली होती. त्यावेळेला विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने भाविकांचा हिरमोड झाला.
रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी नगरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी संबंधित खात्याने घेतलीच पाहिजे, अशा सूचना केल्या होत्या. तर रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी गणेशोत्सव काळामध्ये रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र ऐन गणेशोत्सव काळात लोकांना अंधारातच संध्याकाळची आरती करावी लागली. विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने खरवली गावामध्ये नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती येथील नागरिक मोहन जाधव यांनी दिली आहे.