जीर्ण सबस्टेशनमुळे जीवास धोका
By Admin | Updated: October 7, 2015 00:04 IST2015-10-07T00:04:33+5:302015-10-07T00:04:33+5:30
कोटनाका येथील वीज वितरण कंपनीकडून उभारण्यात आलेल्या २२/२२ के व्ही सबस्टेशनची दुरवस्था झाली आहे. सबस्टेशनमधील काही उपकरणे जीर्ण झाली असून

जीर्ण सबस्टेशनमुळे जीवास धोका
उरण : कोटनाका येथील वीज वितरण कंपनीकडून उभारण्यात आलेल्या २२/२२ के व्ही सबस्टेशनची दुरवस्था झाली आहे. सबस्टेशनमधील काही उपकरणे जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या, नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
कोटनाका सबस्टेशनमधील काही उपकरणे अॅल्युमिनियमच्या तारेने बांधलेली आहेत. येथील लोखंडी चॅनेल गंजलेल्या अवस्थेत लोंबकळत आहेत. जमिनीपासून केवळ ९ ते १० फुटापर्यंत उंची असलेल्या या सबस्टेशनवर चिरनेर फिडर, द्रोणागिरी फिडर व इंडस्ट्रीयल फिडर अवलंबून असून, जीर्णावस्थेमुळे कधीही वीजपुरवठा बंद होऊ शकतो.
सबस्टेशन अतिशय जीर्ण व धोक्याचे झाले असून, त्याच्या बाजूला तीन-साडेतीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नवीन सबस्टेशन उभारण्यात आले आहे. मात्र ते अद्याप सुरू न झाल्याने येथील उपकरणे धूळखात पडली आहे. दुर्घटना घडल्यावरच वीज वितरणला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
केबल टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कंट्रोलिंग व टेस्टिंगचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. महिनाभरात नवीन सबस्टेशनवरील जोडणीची कामे पूर्ण होतील. त्यानंतर हे सबस्टेशन सुरू करण्यात येईल. वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर जुने सबस्टेशन बंद करण्यात येईल.
- प्रवीण साळी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, वीज वितरण उरण